गुजरातचा एकमेव मुस्लीम खासदार पुन्हा निवडला जाणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 02:55 PM2017-08-08T14:55:16+5:302017-08-08T18:50:55+5:30
अहमद पटेल जिंकले तर गुजरातमधील एकमेव मुस्लीम खासदार म्हणून ओळखले जातील. याआधीच्या राज्यसभा टर्ममध्येही गुजरातमधून जाणारे ते एकमेव मुस्लीम खासदार होते.
अहमदाबाद, दि.8- गुजरातमध्ये आज बलवंतसिंग राजपूत आणि अहमद पटेल यांच्यामध्ये राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. कॉंग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये आलेल्या राजपूत यांच्या पारड्यात भाजपाने आपले संपुर्ण वजन टाकले आहे. कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांना हरवण्यासाठी भाजपाचे प्रयत्न चालू आहेत. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी तो इतिहास रचेल यात शंका नाही. अहमद पटेल या निवडणुकीमध्ये पराभूत झाले तर कॉंग्रेससाठी तो मानहानीकारक पराभव असेल आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा विजय मानला जाईल. पण ते जिंकले तर गुजरातमधील एकमेव मुस्लीम खासदार म्हणून ओळखले जातील. याआधीच्या राज्यसभा टर्ममध्येही गुजरातमधून जाणारे ते एकमेव मुस्लीम खासदार होते.
भारतीय जनता पक्षाने 2014 साली झालेल्या लोकसभेत गुजरातमधील सर्व जागा जिंकल्या. या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा एकही मुस्लीम खासदार निवडून गेलेला नाही. त्यामुळे साहजिकच गुजरातमधूनही लोकसभेत एकही मुस्लीम खासदार निवडून गेलेला नाही. भाजपाच्या लोकसभेतील सर्व 282 खासदारांपैकी एकही खासदार मुस्लीम नाही, सत्ताधारी पक्षाचा लोकसभेत एकही मुस्लीम खासदार नसण्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे गुजरातमध्ये अहमद पटेल हे एकमेव मुस्लीम खासदार राज्यसभेत होते. आता आजच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यास हे उदाहरण कायम राहिल. पटेल पराभूत झाल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गुजरातचा एकही मुस्लीम खासदार नसेल. सध्या राज्यसभेत पटेल यांच्याबरोबर मधुसुदन मिस्त्री कॉंग्रेसतर्फे राज्यसभेत गेलेले आहेत.
अहमद पटेल 1977,1980. 1984 असे सलग तीन टर्म्स लोकसभेत निवडून गेले. 1977 साली गुजरातमधून एहसान जाफरीदेखिल लोकसभेत निवडून गेले होते. एहसान जाफरी आणि अहमद पटेल हे आजवर दोनच मुस्लीम खासदार गुजरातमधून लोकसभेत जाऊ शकले आहेत.
कॉंग्रेससाठी अहमद पटेल का महत्त्वाचे ?
अहमद पटेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1949 रोजी गुजरातच्या भरुचमध्ये झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात त्यांनी 1976 साली प्रवेश केला. 1977 पासून तीन टर्म ते लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर प्रदेश कॉंग्रेस आणि केंद्र पातळीवर त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या. जवाहर भवन ट्रस्टची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यानंतर 1993-99, 1999-2005, 2005-2011, 2011-2017 अशा सलग चार टर्म ते राज्यसभेत आहेत. संपुआ सरकारच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने त्यांना पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाल्याचे सांगण्यात येते.
दोन पक्षांचे अध्यक्ष दोन सभागृहांमध्ये
गुजरात राज्यसभा निवडणुकांमुळे आणखी एक नवी घटना घडणार आहे. भाजपाचे अमित शहा राज्यसभेत निवडून जातील. तिकडे लोकसभेत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून गेलेल्या आहेत. त्यामुळे देशातील दोन प्रमुख
पक्षांचे अध्यक्ष संसदेच्या दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये दिसून येतील.