'भाजपासोबत युती केली नसती तर निवडणुकीत आणखी 15 जागा सहज जिंकल्या असत्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 10:49 AM2018-03-30T10:49:43+5:302018-03-30T10:49:43+5:30
ही युती राजकीय फायद्यासाठी नव्हे तर विकासासाठी होती.
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेशला पुरेशी मदत न मिळाल्याच्या कारणावरून रालोआतून बाहेर पडणारे तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी आता भाजपाचे जाहीर वाभाडे काढायला सुरूवात केली आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेल म्हणून आम्ही भाजपाला साथ दिली. मात्र, भाजपाने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आमच्या पदरात काहीच न पडता निवडणुकीत विनाकारण 15 जागा गमवाव्या लागल्या, अशी टीका चंद्राबाबू यांनी केली.
आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आम्ही भाजपशी युती केली. ही युती राजकीय फायद्यासाठी नव्हे तर विकासासाठी होती. तेव्हा आम्ही युती न करता स्वतंत्रपणे लढलो असतो तर टीडीपीला आणखी 15 जागा सहज मिळाल्या असत्या. विशेष राज्याचा दर्जा देतो, असे सांगून भाजपाने आमची अक्षरश: फसवणूक केल्याचे चंद्राबाबू यांची टीडीपीच्या 37 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात सांगितले.
आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा न दिला गेल्याने आणि आंध्र प्रदेशच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे कारण देत चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जर आंध्र पद्रेशला विशेष राज्याचा दर्जा दिला तर बिहार, झारखंड, ओदिशा अशी सगळीच राज्ये विशेष राज्याचा दर्जा मागतील असे म्हणत ही मागणी अर्थमंत्री अरूण जेटलींनी फेटाळली होती. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चंद्राबाबू यांचा निर्णय एकतर्फी आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. चंद्राबाबू यांचा निर्णय पूर्णतः राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. टीडीपीला आंध्र प्रदेशच्या विकासाची काळजी नसल्यानं त्यांनी एनडीएपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची टीका शाह यांनी केली होती.