आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे सापडले अवशेष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 01:08 PM2024-01-13T13:08:31+5:302024-01-13T13:09:03+5:30
समुद्रात ३,४०० मी. खोल पाण्यात शोध
नवी दिल्ली: २०१६ साली भारतीय हवाई दलाचे एएन-३२ या जातीचे मालवाहू विमान बंगालच्या उपसागरात कोसळले होते. आठ वर्षांनंतर शोधमोहिमेत त्याचे अवशेष चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यापासून ३१० किमी अंतरावर ३४०० मीटर खोल पाण्यात आढळून आले. अपघातात विमानातील २९ जण बेपत्ता झाले होते. या विमानाच्या अवशेषांची तपासणी केल्यानंतर अपघातामागील कारणाचे गूढ उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी या संस्थेने विकसित केलेल्या ऑटोनॉमस युटिलिटी व्हेइकल (एयूव्ही) या उपकरणाद्वारे बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात आला. विमानाशी शेवटचा संपर्क झाला तेव्हा ते बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात होते. समुद्रात सुमारे ३४०० मीटर खोल पाण्यात सोनार, सिथेंटिक ॲपर्चर सोनार व हायरेझोल्यूशन फोटोग्राफी या तंत्रज्ञानाच्या मदतीने बेपत्ता विमानाच्या अवशेषांचा शोध लावण्यात आला. ते एएन-३२ जातीच्या विमानाचे अवशेष असल्याचे त्यांच्या छायाचित्रांच्या विश्लेषणातून सिद्ध झाले. २२ जुलै २०१६ रोजी चेन्नई नजीकच्या हवाई तळावरून एएन-३२ विमानाने उड्डाण केले होते.
विमानाच्या शोधासाठी मोठी शोधमोहीम
- एएन-३२ विमानाचा शोध घेण्यासाठी २०१६ साली भारतीय हवाई दलाने नौदलाच्या सहकार्याने शोधमोहीम हाती घेतली.
- नौदलाचे डोनिअर विमान व ११ यु्द्धनौकांचा या मोहिमेत समावेश केला होता.
- चेन्नई परिसरातील खराब हवामानामुळे ही शोधमोहीम आटोपती घेण्यात आली होती. एएन-३२ विमान नेमके कुठे आहे हे स्थान दाखविणारा ब्लॅक बॉक्स त्याला जोडलेला नव्हता. त्यामुळे त्या विमानाचा ठावठिकाणा शोधणे कठीण होऊन
- बसले होते.