'पंतप्रधानांनी आमच्या 'मन की बात' ऐकावी, ब्रिजभूषण गुन्हेगार; आंदोलक पैलवानांचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 05:55 PM2023-04-30T17:55:23+5:302023-04-30T18:23:15+5:30
राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या आठ दिवसांपासून देशातील दिग्गज कुस्तीपटूंचा संप सुरू आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या आठ दिवसांपासून देशातील दिग्गज कुस्तीपटूंचेआंदोलन सुरू आहे. या संपादरम्यान पैलवानांनी पत्रकार परिषद घेऊन स्वत:ला न्याय मिळावा, अशी मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, असं पै. बजरंग पुनिया यावेळी म्हणाला.
'कुटुंबवाद तिकडे सुरू आहे'
बजरंग पुनिया पुढे म्हणाले की, फेडरेशन आमच्या संपाला वेगळं रुप देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही कोणाचा ताबा मागत नाही आहोत. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. कुटुंबवादाच्या मुद्द्यावर पुनिया म्हणाला की, सगळा कुटुंबवाद तिकडेच होत आहे आणि ते आमच्यावर आरोप करत आहेत.
आमच्यापेकी कोणत्याही खेळाडूचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, परंतु ब्रिजभूषण यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिज भूषण यांनी कोणते मोठए काम केले, ज्यामुळे त्यांना फुलांचा हार घालण्यात येत आहे. यापेक्षा मोठा गुन्हेगार भारतात नाही, अशी टीकाही पुनिया याने केली आहे.
'अनेक राज्यातील खेळाडुंचा पाठिंबा'
यावेळी विनेश फोगट म्हणाली की, आम्ही कायदेशीर प्रक्रियेवर काही बोलणार नाही? अनेक राज्यांतील खेळाडू पाठिंबा देत आहेत. पंतप्रधानांनी आमच्या मनाचेही ऐकावे. कोट्यवधी लोक आमच्या पाठिशी आहेत, हीच आमची ताकद आहे, अशी प्रतिक्रिया पै. विनेश फोगट हिने यावेळी दिली.
ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल
महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दोन प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवले. महिला कुस्तीपटूंकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दोन एफआयआरमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत.