कुस्तीपटू नोकरीवर, ‘खाप’ मात्र नाराज; जंतरमंतरवरील ९ जूनचे आंदोलन स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 05:53 AM2023-06-07T05:53:48+5:302023-06-07T05:54:04+5:30
शेतकरी नेत्यांनी कुरुक्षेत्रच्या महापंचायतीत ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक न केल्यास जंतरमंतरवर पुन्हा कुस्तीपटूंचे निदर्शने सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान त्याचे नेतृत्व करणारे कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे रेल्वेत नोकरीवर रुजू झाले आहेत. त्यामुळे मात्र शेतकरी आणि खाप नेत्यांची त्यांच्यावर नाराज झाली आहे. त्यातून त्यांनी ९ जून रोजी जंतरमंतरवर होणारे आंदोलन स्थगित केले आहे.
शेतकरी नेत्यांनी कुरुक्षेत्रच्या महापंचायतीत ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक न केल्यास जंतरमंतरवर पुन्हा कुस्तीपटूंचे निदर्शने सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला होता. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना जंतरमंतरवरून हटवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय किसान युनियनचे नेते नरेश टिकैत यांनी कुस्तीपटू त्यांच्या नोकरीवर परतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ‘गृहमंत्री अमित शाह आणि कुस्तीपटूंमध्ये काय करार झाला हे मला माहीत नाही, जर त्यांनी स्वत:च करार करण्याचा निर्णय घेतला असेल, तर आम्ही त्याबाबत काहीही करू शकत नाही,’ असे ते म्हणाले. बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ९ जूनचे प्रस्तावित आंदोलन रद्द करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, विनेश फोगटच्या बलाली गावात सर्व खाप सर्व जाती महापंचायत ७ जून रोजी बोलावण्यात आली आहे.
ब्रिजभूषण यांच्या जवळच्या १२ जणांचे जबाब घेतले
- रविवारी रात्री दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) ब्रिजभूषण यांच्या बिष्णोहरपूर येथील घरी पोहोचले आणि त्यांच्या जवळच्या १२ जणांचे जबाब नोंदवले.
- ब्रिजभूषणचे चालक, सुरक्षा कर्मचारी, माळी आणि नोकर यांचा त्यात समावेश आहे. याप्रकरणी एसआयटीने आतापर्यंत १३७ जणांचे जबाब नोंदवले आहेत.