Wrestler Protest: भाजप नेत्याचा कॉल, कुस्तीपटूंचा गंगेत पदके विसर्जित न करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 08:43 AM2023-05-31T08:43:08+5:302023-05-31T08:46:30+5:30
२३ एप्रिलपासून आंदोलनाला बसलेल्या पैलवानांनी काल पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता.
२३ एप्रिलपासून आंदोलनाला बसलेल्या पैलवानांनी काल पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आंदोलकांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगातीरी हजेरी लावली. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनी पदकं विसर्जित करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलक पैलवानांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आंदोलक पैलवानांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश; कष्टाचं 'सोनं' घेतलं ताब्यात
'हर की पौरी'मध्ये पोहोचल्यानंतर सुमारे २० मिनिटे कुस्तीपटू शांतपणे उभे होते. मग ते पदक हातात घेऊन गंगा नदीच्या काठावर बसले. ४० मिनिटांनी पै.बजरंग तिथे पोहोचले. आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने जिंकलेली पदके विनेशचे पती सोंबीर राठी यांच्याकडे होती. साक्षीने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते.अनेक नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर येथे सुमारे अडीच तासानंतर पैलवान परतले. शेतकरी नेते शामसिंग मलिक आणि नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंकडे हा वाद सोडवण्यासाठी पाच दिवसांची मुदत मागितली आहे.
भाजपच्या एका नेत्याचा फोन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दबावानंतर त्यांनी गंगेत पदक फेकण्याचा विचार बदलला. एका कुस्तीपटूने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “आम्हाला आश्वासन देण्यात आले होते की आमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, म्हणून आम्ही माघार घेतली. मात्र, सरकारने आपले आश्वासन सोडल्यास आम्ही पुन्हा गंगेत पदक विरसर्जित करण्यासाठी परतू." 'हर की पौरी'मधून कुस्तीपटू परतल्यानंतर नरेश टिकैत म्हणाले, "आम्ही पाच दिवसांचा अवधी मागितला आहे आणि पैलवानांना थांबायला सांगितले आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशातील एका केंद्रीय मंत्र्यानेही कुस्तीपटूंपर्यंत पोहोचून त्यांची पदके 'विसर्जन' न करण्याचे आवाहन केल्याचे सांगितले जात आहे.