"नार्को टेस्ट करा आणि स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करा", साक्षी मलिकचे ब्रिजभूषण सिंहांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 03:50 PM2023-05-10T15:50:49+5:302023-05-10T15:51:34+5:30
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी देशातील काही नामवंत कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत.
नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने बुधवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना नार्को चाचणी करून स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. दरम्यान, साक्षी मलिकचे हे विधान अशा वेळी आले आहे की, दिल्ली न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांवर दाखल केलेल्या एफआयआरचा स्टेटस रिपोर्ट दिल्ली पोलिसांकडून मागवला आहे.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी हरजित सिंग जसपाल यांनी आंदोलक कुस्तीपटूंच्या याचिकेवर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. तपासावर देखरेख ठेवली जावी आणि कथित पीडितांचे जबाब न्यायालयासमोर नोंदवावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच, 28 एप्रिल रोजी एफआयआर दाखल झाल्यापासून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा यात करण्यात आला आहे. न्यायालयाने पोलिसांना 12 मे पर्यंत रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले. यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.
दरम्यान, "पोलीस कोणताही तपास करण्यास तयार नाही. पोलिसांनी न्यायालयासमोर पीडितांचे जबाबही नोंदवलेले नाहीत", असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्धच्या दोन्ही एफआयआरच्या प्रतीही सीलबंद कव्हरमध्ये न्यायालयात सादर करण्यात आल्या. एक एफआयआर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळासाठी मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत नोंदविला गेला आहे, तर दुसरा गुन्हा इतर तक्रारदारांच्या लैंगिक छळासाठी नोंदवला गेला आहे.
महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर 28 एप्रिल रोजी याप्रकरणी दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दावा केला की, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाहता एफआयआर नोंदवल्यापासून 24 तासांच्या आत पीडितांचे जबाब न्यायालयात नोंदवले गेले पाहिजेत. एफआयआर नोंदवल्यानंतर तीन दिवसांनी जबाब नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
क्रीडा मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने पीडित कुस्तीपटूच्या पतीला फोन करून प्रकरण मिटवण्यास सांगितल्याचा आरोप आहे, असा दावा वकिलाने केला आहे. राज्य कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्याने प्रशिक्षक आणि पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही वकिलाने केला आहे. वकिलाने दावा केला, "त्या व्यक्तीने सांगितले की, मुलींनी चूक केली आहे. नेताजींना भेटा, प्रकरण मिटवू."
दरम्यान, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी देशातील काही नामवंत कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. यामध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांचा समावेश आहे.