"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:35 AM2024-10-02T11:35:05+5:302024-10-02T11:36:56+5:30

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर आलेल्या पंतप्रधान मोदींच्या फोनविषयी कुस्तीपटू विनेश फोगटने भाष्य केलं आहे.

Wrestler Vinesh Phogat has commented on PM Modi phone call after he was disqualified from the Paris Olympics 2024 | "PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा

"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा

Vinesh Phogat PM Narenda Modi Call : भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणुकीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम सामन्याच्या दिवशी विनेशचे वजन थोडे जास्त असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर विनेश फारच निराश झाली आणि तिने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी विनेशला देशभरातून पाठिंबा दर्शवण्यात येत होता. त्यादरम्यान, विनेशला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता का? असा सवाल उपस्थित केला जात होता. याबाबत आता विनेश फोगटने स्वतः खुलासा केला आहे. आपल्याला पंतप्रधान मोदींचा फोन आला असल्याची माहिती विनेशने दिली आहे.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट सध्या हरियाणा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. विनेश फोगट प्रचारादरम्यान तिच्या पॅरिस ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयाबद्दल बोलत आहे. त्या वाईट काळात मला कोणाची साथ मिळाली नसल्याचे विनेशने सांगितले. काही दिवसांपूर्वी विनेशने सांगितले की, अपात्र ठरल्यानंतर तिला भारत सरकारकडून एकच फोन आला होता. मात्र आता हा फोन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होता, असा खुलासा विनेशने केला आहे. मात्र विनेशने पंतप्रधान मोदींसोबत त्यावेळी संवाद साधला नव्हता. विनेशने यावेळी भारतीय अधिकाऱ्यांनी ठेवलेली अट मान्य केली नाही. त्यामुळे तिने पंतप्रधान मोदींसोबत बोलण्यास नकार दिला.

लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विनेशने याबाबत खुलासा केला आहे. विनेश फोगटने सांगितले की, जेव्हा तिला अपात्र ठरवण्यात आले तेव्हा तिला नरेंद्र मोदींचा फोन आला होता. त्यांचा मला थेट फोन आला नाही. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की त्यांना (पंतप्रधान मोदी) बोलायचे आहे. त्यावेळी अधिकारी विनेशने अटी मान्य करायला तयार नसल्याते सांगत बोलण्यास नकार दिल्याचे तिने सांगितले. 

"त्यांनी काही अटी घातल्या होत्या की, बोलत असताना माझा एकही माणूस माझ्यासोबत नसणार. त्यांच्याकडे एक माणूस असेल जो फोनवर बोलणं करुन देईल आणि व्हिडिओ शूट करेल आणि सोशल मीडियावर टाकण्यात येईल. मी हा व्हिडीओ सोशल मीडियावर जाईल का असे  विचारले तेव्हा त्यांनी हो म्हटले. त्यावेळी मी नकार दिला कारण मला माझ्या भावनांची खिल्ली उडवायची नव्हती. त्यांना खेळाडूंविषयी सहानुभूती असती तर ते रेकॉर्डिंगशिवाय बोलले असते. कदाचित त्यांना माहित असेल की विनेश बोलली तर दोन वर्षांचा हिशोब नक्की मागेल. ते त्यांच्या इच्छेनुसार रेकॉर्डिंग कट करू शकले असते पण मी तसे करू शकत नाही," असं विनेशने म्हटलं आहे.
 
दरम्यान, विनेश फोगटने दोन वर्षापूर्वी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरोधात आंदोलन केले होते. विनेश आणि अनेक महिला कुस्तीपटूंनी तत्कालीन प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर तिची पोलिसांशी झटापट झाली आणि अनेक महिने आंदोलन करत होती. यानंतर ती पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. राष्ट्रीय शिबिरात एकाच दिवसात ५३ किलो वजनी गटात पराभूत झाल्यानंतरही विनेश ५० किलो वजनी गटातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती.

Web Title: Wrestler Vinesh Phogat has commented on PM Modi phone call after he was disqualified from the Paris Olympics 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.