हे लोक आता ऑलिम्पिक पदकही जिंकू शकत नाहीत; आंदोलक कुस्तीपटूंवर ब्रिजभूषण सिंह यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 02:42 PM2023-01-19T14:42:22+5:302023-01-19T14:42:59+5:30
दिल्लीच्या जंतरमंतरवर बुधवारपासून देशातील काही दिग्गज कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत.
नवी दिल्ली:दिल्लीच्या जंतरमंतरवर बुधवारपासून देशातील काही दिग्गज कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केलं आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिच्या आरोपानंतर हे सर्व कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. विनेश फोगाट त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. काही प्रशिक्षक महिला खेळाडूंचा लैंगिक छळ करतात आणि ब्रिजभूषण शरण सिंहही त्यात सामील असल्याचे फोगाटने म्हटले होते. लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरातील प्रशिक्षकांनी शोषण केल्याचा दावा आहे.
या आरोपांवर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिलं. कुस्तीपटू केवळ 22 ते 28 वर्षे वयोगटातच चांगली कामगिरी करू शकतात. निदर्शने करत असलेले हे कुस्तीपटू ऑलिम्पिक पदकही जिंकू शकत नाहीत. यामुळेच संतापून ते निदर्शने करत आहेत. काही दिवसांपूर्वी हरियाणातील कुस्ती मंडळात बदल करण्यात आला असून हे काम निवडक मंडळाकडे सोपविण्यात आले आहे. आपल्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड व्हावी, अशी काहींची इच्छा असते, असे ब्रिजभूषण म्हणाले.
याशिवाय, अशाप्रकारचे आरोप ऐकून मला खूप वाईट वाटत आहे. कोणताही खेळाडू माझ्यावर किंवा मुख्य प्रशिक्षकावर असे आरोप करू शकत नाही. काही पैलवानांवर धरणे देण्यासाठी दबाव टाकण्यात आला आहे. पण, 97 टक्के खेळाडू महासंघासोबत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास फाशी घेईन, असेही ते काल म्हणाले होते.
काय प्रकरण आहे?
कुस्तीपटू विनेश फोगाने रडत रडत आरोप केला होता की, WFI च्या सांगण्यावरून तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच, तिने दावा केला की, ती 10-12 कुस्तीपटूंना ओळखते ज्यांचा महासंघाने लैंगिक छळ केला आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, जर आम्ही देशासाठी लढू शकतो, तर आमच्या हक्कांसाठीही लढू शकतो. या प्रकरणी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममधील प्रशिक्षक प्रवीण दहिया यांनी सांगितले की, विनेश फोगटने आरोप केले ते विनाकारण केले नाहीत. सत्य बाहेर यावे आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी कुस्तीगीरांची इच्छा आहे.