साक्षी, बजरंग आणि विनेशविरोधात पैलवानांचे आंदोलन; साक्षीचा ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:09 IST2024-01-03T15:08:35+5:302024-01-03T15:09:34+5:30
Sakshi Malik Press Conference: दिल्लीच्या जंतर-मंतरवर शेकडो पैलवानांनी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगटविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

साक्षी, बजरंग आणि विनेशविरोधात पैलवानांचे आंदोलन; साक्षीचा ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप
Sakshi Malik Press Conference: गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कुस्ती संघटनेबाबत सुरू असलेल्या वादाला बुधवारी नवे वळण मिळाले. आत्तापर्यंत साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट खा. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत होते. पण, बुधवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर शेकडो पैलवानांनी या तिघांविरोधात आंदोलन सुरू केले. यादरम्यान, साक्षी मलिकने ब्रिजभूषण यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला.
#WATCH | Young wrestlers hold protests against Olympic-winning wrestlers Sakshee Malikkh, Vinesh Phogat and Bajrang Punia, at Delhi's Jantar Mantar pic.twitter.com/5yHVsksKp8
— ANI (@ANI) January 3, 2024
पोलिसांचे म्हणणे आहे की, या लोकांच्या आंदोलनाबद्दल कोणतीही पूर्व सूचना दिली नव्हती. या आंदोलक ज्युनियर कुस्तीपटूंमध्ये बागपतच्या छपरौली येथील 300 जणांचा समावेश आहे. याशिवाय नरेलाच्या वीरेंद्र रेसलिंग अकादमीतूनही काही लोक आले आहेत. एवढंच नाही तर आता आणखी काही पैलवान येणार असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. या आंदोलकांनी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगटवर देशाची कुस्ती उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे.
साक्षी मलिकचे ब्रिजभूषण यांच्यावर आरोप
दरम्यान, आज पत्रकार परिषद घेऊन साक्षी मलिकने ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप केला. "ब्रिजभूषण यांचे लोक पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. आमच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या आईला धमकीचे फोन येताहेत. आम्हाला सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे." कुस्ती संघटना करण्यावर साक्षी म्हणाली, "सरकारने नवीन फेडरेशनच्या निलंबनाचे आम्ही स्वागत करतो. फेडरेशनमध्ये संजय सिंह यांचा हस्तक्षेप होता कामा नये. पुन्हा नवीन फेडरेशन आल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही."
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) January 3, 2024
साक्षी पुढे म्हणते की, "आम्हाला माहित आहे की, ब्रिजभूषण खूप पॉवरफूल आहेत. पण, कोणाशीही न बोलता आपल्या घरात बसून ते नॅशनल गेम्सची घोषणा करतील, असे वाटले नव्हते. आता आमच्यावर ज्युनिअर पैलवानांचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप होत आहे. मी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. आमच्यामुळे ज्युनिअर्सचे करिअर उद्ध्वस्त होऊ नये, अशी आमची इच्छा आहे," असंही साक्षी यावेळी म्हणाले.