Wrestlers Protest: कोट्यवधींची संपत्ती, आलिशान वाहने; अशी आहे WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांची लाईफस्टाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 03:35 PM2023-01-20T15:35:57+5:302023-01-20T15:36:43+5:30
Wrestlers Protest: ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक छळाचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वादात सापडलेले बृजभूषण शरण सिंह कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक आहेत.
देशासाठी पदक आणणाऱ्या कुस्तीपटूंची नाराजी आता समोर आली आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी हे कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांनी भाजप खासदार आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांसारख्या कुस्तीपटूंचा यात समावेश आहे.
यापूर्वीही वादात सापडलेले ब्रिजभूषण शरण सिंह हे कोट्यवधींचे मालक आहे. त्यांच्याकडे लक्झरी वाहनेदेखील आहेत. ब्रिज भूषण शरण सिंग हे सहा वेळा खासदार राहिले आहेत. तसंच गेल्या ११ वर्षांपासून ते भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत.
पती-पत्नीच्या नावे १६ कोटींची संपत्ती
२०१९ मध्ये दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडे ९.८९ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. आलिशान गाड्यांचे शौकीन असलेल्या सिंह यांच्याकडे टोयोटा इनोव्हा आणि महिंद्रा स्कॉर्पिओ सारख्या एसयूव्ही कार आहेत. त्यांच्या पत्नीकडे ६.३५ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर फॉर्च्युनर कार आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडे ५० ग्रॅम आणि त्यांच्या पत्नीकडे २०० ग्रॅम सोने आहे.
पती-पत्नीकडे एकूण पाच शस्त्रे
लक्झरी गाड्यांशिवाय त्यांना शस्त्रास्त्रांचाही शौक आहे. पती-पत्नीकडे एकूण पाच शस्त्रे आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या नावावर एक पिस्तूल, एक रायफल, एक रॅपिटर आहे. त्यांच्या पत्नीकडे रायफल आणि रॅपिटरचा परवाना आहे. त्यांच्याकडे एक कोटींची शेतजमीन आणि दोन कोटींची बिगरशेती जमीनदेखील आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे नाव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते अनेकदा वादात सापडला होते.