Wrestlers Protest: ब्रिजभूषण शरण सिंह यांना अद्याप अटक का नाही? दिल्ली पोलिसांनी दिली मोठी माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 02:19 PM2023-05-31T14:19:21+5:302023-05-31T14:20:12+5:30
Wrestlers Protest: गेल्या अनेक दिवसांपासून पैलवानांचे ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे.
Wrestlers Protest: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून देशातील दिग्गज कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू होते. पण, दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन त्यांचे तंबूही काढून टाकले. यानंतर देशभरात संतापाची लाट उमटली. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की, अखेर पोलीस ब्रिजभूषण सिंग यांना का अटक करत नाहीये?
गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटून ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करत आहेत. पण, अद्याप त्यांना अटक झालेली नाही. याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. पण, सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर एफआयआर आणि आरोपांची चौकशी सुरू झाली आहे. पोलीस दोन आठवड्यात अहवाल दाखल करू शकतात.
आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा नसेसल, तेव्हाच पोलीस अंतिम अहवाल म्हणजेच एफआर दाखल करतात. पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, मोठ्या संख्येने लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अनेक साक्षीदारांचेही जबाब नोंदवले जात आहेत. पण, अद्याप कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे ब्रिजभूषण यांना अटक झालेली नाही.
ब्रिजभूषण काय म्हणतात?
आजही ब्रिजभूषण यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला, तर मी स्वत: फाशी घेईन. जर तुमच्याकडे (कुस्तीपटूंकडे) काही पुरावे असतील तर ते कोर्टात सादर करा. मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे," असे ब्रिजभूषण यांचे म्हणणे आहे.