"महिला कुस्तीपटूंना वडिलांप्रमाणे मिठी मारली", 'ब्रिजभूषण' यांच्या विधानावरून शिवसेना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 01:24 PM2023-05-03T13:24:15+5:302023-05-03T13:25:40+5:30

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

Wrestlers protesting in Delhi against WFI President Brijbhushan Singh, Shiv Sena Thackeray MP Priyanka Chaturvedi has criticized Singh through a tweet | "महिला कुस्तीपटूंना वडिलांप्रमाणे मिठी मारली", 'ब्रिजभूषण' यांच्या विधानावरून शिवसेना आक्रमक

"महिला कुस्तीपटूंना वडिलांप्रमाणे मिठी मारली", 'ब्रिजभूषण' यांच्या विधानावरून शिवसेना आक्रमक

googlenewsNext

Priyanka Chaturvedi Statement on WFI Chief | नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवानांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ब्रिजभूषण यांच्यावर बोचरी टीका करून त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. ब्रिजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंना वडिलांप्रमाणे मिठी मारली असे म्हटले होते. प्रियंका चतुर्वेदी यांनी या विधानाचा दाखला देत भाजप खासदाराच्या या वृत्तीला 'आजार आणि घृणास्पद' म्हटले आहे. 

प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटच्या माध्यमातून ब्रिजभूषण यांच्यावर बोचरी टीका केली. "आजार आणि घृणास्पद. ते त्यांच्या शक्तिशाली पदाचा फायदा घेऊन मदत मागण्यासाठी आलेल्या पैलवानाचे शोषण करतात. तुम्ही कोणत्याही महिलेच्या समंतीशिवाय तिला मिठी मारू शकत नाही आणि पुन्हा याला वडिलांप्रमाणे मिठी मारली असे सांगितले जात आहे. सातत्याने या माणसाला पाठीशी घालणाऱ्या भाजपची लाज वाटते."

ब्रिजभूषण यांच्या विधानाने गदारोळ
दरम्यान, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एका ट्विटला रिट्विट केले आहे, ज्यामध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणतात की, महिला पैलवानांना त्यांच्या वडिलांसोबत चर्चा करायची होती, पण मोबाईल नसल्यामुळे माझ्या फोनवरून त्यांचा संवाद घडवून आणला. बोलून झाल्यानंतर मी त्यांना मिठी मारली. पण जेव्हा तिला अस्वस्थ वाटत होते तेव्हा मी तिला सांगितले की, मी तिला वडिलांप्रमाणे मिठी मारत आहे. 

अद्याप 'आखाड्या'बाहेरील कुस्ती सुरूच
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज बुधवारी आंदोलनाला अकरा दिवस पूर्ण झाले असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. खरं तर ब्रिजभूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार आता केवळ तीन पैलवान आंदोलनस्थळी आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 


 

Web Title: Wrestlers protesting in Delhi against WFI President Brijbhushan Singh, Shiv Sena Thackeray MP Priyanka Chaturvedi has criticized Singh through a tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.