कुस्तीपटूंचे आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित; क्रीडामंत्र्यांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:21 AM2023-06-08T06:21:48+5:302023-06-08T06:22:55+5:30
दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन
नवी दिल्ली : सरकारने भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी १५ जूनपर्यंत पूर्ण होईपर्यंत थांबण्यास सांगितल्याने आंदोलक कुस्तीपटूंनी बुधवारी आंदोलन एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचे मान्य केले. कुस्तीपटूंनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी सुमारे पाच तासांच्या बैठकीनंतर सांगितले की, सरकारने त्यांना आश्वासन दिले आहे की, पोलिस त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घेतील.
बैठकीला बजरंग पुनिया, साक्षी मलिक, त्यांचे पती सत्यवर्त कादियान व जितेंद्र किन्हा उपस्थित होते. मलिक आणि पुनिया या दोघांनीही ठामपणे सांगितले की, आंदोलन अद्याप संपलेले नाही, सरकारच्या विनंतीनुसार आंदोलन स्थगित केले आहे.
त्यांच्या आरोपांची चौकशी १५ जूनपर्यंत पूर्ण होईल. हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. कुस्ती महासंघ अध्यक्षपदाची निवड ३० जूनला पार पडेल. - अनुराग ठाकूर, क्रीडामंत्री.