सुवाच्य, मोठ्या अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा! राज्य सरकारला परिपत्रक काढण्याचे कोर्टाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 07:27 AM2024-01-10T07:27:04+5:302024-01-10T07:28:01+5:30
न्यायाधीशांना डॉक्टरांनी लिहिलेली भाषा कळेना अन्...
कटक : आता डॉक्टरांना सर्व प्रिस्क्रिप्शन आणि वैद्यकीय-कायदेशीर अहवाल सुवाच्य हस्ताक्षरात, शक्य असल्यास मोठ्या अक्षरात किंवा टाइप केलेल्या स्वरूपात लिहिण्यास कोर्टाने सांगितले आहे. ओरिसा उच्च न्यायालयानेराज्य सरकारला याबाबत एक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशानुसार, डॉक्टरांनी सुवाच्च हस्ताक्षरात, शक्य असल्यास मोठ्या अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहिल्यास ही कागदपत्रे वाचताना न्यायपालिकेला ‘अनावश्यक थकवा’ सहन करावा लागणार नाही, असेही कोर्टाने यावेळी म्हटले आहे.
न्यायाधीशांना भाषा कळेना अन्...
न्यायाधीश एस.के. पाणिग्रही यांना याचिकेसोबत जोडलेला पोस्टमार्टेम अहवाल नीट वाचता आला नाही. यातून काहीही न समजल्याने खटल्याचा निर्णय घेणे अवघड गेले, त्यामुळे उच्च न्यायालयाकडून हे निर्देश देण्यात आले.
याचिका काय होती?
डेंकनाल जिल्ह्यातील हिंडोल येथील रसनंद भोई यांचा मोठा मुलगा सौवाग्या रंजन भोई याचा साप चावल्याने मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी सानुग्रह अनुदानासाठी विचार करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे
केली होती. त्यावेळी सुनावणीनंतर हायकोर्टाने हे निर्देश दिले.
कोर्टाचे काय निर्देश?
अनेक प्रकरणांमध्ये, शवविच्छेदन अहवाल लिहिताना बहुतेक डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वैद्यकीय- कायदेशीर कागदपत्रांना समजून घेताना अडचण निर्माण होते. न्यायालयालाही अशी वैद्यकीय कागदपत्रे वाचणे कठीण जाते. डॉक्टरांमध्ये झिग-झॅग हस्ताक्षराचा ट्रेंड बनला आहे, ज्यामुळे सामान्य व्यक्ती आणि न्यायव्यवस्थेला ही कागदपत्रे वाचणे कठीण होत आहे, असे कोर्टाने म्हणाले.