‘शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ; कठोर कारवाईची गरज’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 01:08 PM2024-06-20T13:08:32+5:302024-06-20T13:08:55+5:30

सार्वजनिक ठिकाणी एका महिलेवर अशी तुच्छ टिप्पणी करून तो सुटू शकत नाही म्हणत हायकोर्टाने याचिका फेटाळली.

Writing a womans number in the toilet is sexual harassment Strict action needed | ‘शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ; कठोर कारवाईची गरज’

‘शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ; कठोर कारवाईची गरज’

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, बंगळुरू : पुरुष प्रसाधनगृहाच्या भिंतींवर विवाहित महिलेचा नंबर लिहून “कॉल गर्ल” लिहिणे हा लैंगिक छळ आहे, असे कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक म्हणून काम करणाऱ्या महिलेने सरकारी कामासाठी आपला मोबाइल नंबर केंद्रातील अधिकाऱ्यांना दिला होता. अचानक तिला विविध क्रमांकांवरून वेळी अवेळी अनपेक्षित कॉल येऊ लागले. काहींनी शिवीगाळ केली, तर काहींनी धमकीही दिली. चौकशीत तिला समजले की, तिचा नंबर कॉल गर्ल नंबर म्हणून मॅजेस्टिक बस स्टॉप बंगळुरूच्या जेंट्स टॉयलेटमध्ये भिंतीवर लिहिलेला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करत ३८ वर्षीय अल्ला बक्ष पटेलविरुद्ध ५०१ (बदनामीकारक लिखाण), ५०४ (शिवीगाळ), ५०७ (निनावी फोनवरून धमकावणे) आणि ५०९ (विनयाचा अपमान) या गुन्ह्यांखाली आरोपपत्र दाखल केले.

पटेल याने आरोपपत्र रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. कलम ५०९ आयपीसीचा गुन्हा घडलेला नाही. कलम ५०४ आणि ५०७ ही कलमे अदखलपात्र आहेत असा युक्तिवाद केला. पुरुष प्रसाधनगृहाच्या भिंतीवर महिलेचा क्रमांक कोरणे आयपीसी ५०९ चा गुन्हा आहे, असे म्हणत याचिकाकर्त्याने भिंतीवर नंबर लिहून महिलेचा अपमान केल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. सार्वजनिक ठिकाणी एका महिलेवर अशी तुच्छ टिप्पणी करून तो सुटू शकत नाही म्हणत हायकोर्टाने याचिका फेटाळली.

आजच्या डिजिटल युगात शारीरिक इजा करण्याची गरज नाही. समाजमाध्यमांत निंदनीय विधाने, चित्रे किंवा व्हिडीओच्या माध्यमातून स्त्रीच्या शीलाचा अवमान होऊ शकतो. अशी प्रकरणे कठोरपणे हाताळली पाहिजेत.
- न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना

Web Title: Writing a womans number in the toilet is sexual harassment Strict action needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.