एक्स गर्लफ्रेंडने केला ‘जैश- ए- मोहम्मद’च्या टॉप कमांडरचा 'गेम', 'जहन्नूम' होता कोडवर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 06:45 AM2017-10-10T06:45:51+5:302017-10-10T06:57:02+5:30
खालिदचं उत्तर ऐकून तिला धक्का बसला, त्यानंतर ती बहिणीसोबत थेट जालंधरला पोहोचली खालिदने आयुष्य जहन्नुम बनवलं या रागातून त्याच तरूणीने हा कोडवर्ड ठेवला होता.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी सीमा सुरक्षा दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर अबू खालिदला कंठस्नान घालण्यात आले. खालिदच्या एक्स गर्लफ्रेंडने दिलेल्या माहितीमुळेच त्याचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती आता समोर येत आहे.
खालिदने प्रेमात धोका दिल्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी तिने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली. खालिदबाबत माहिती देण्यासाठी जहन्नूम हा कोडवर्ड ठेवण्यात आला होता अशी माहिती आहे. खालिदने आयुष्य जहन्नुम बनवलं या रागातून त्याच तरूणीने हा कोडवर्ड ठेवला होता. खालिद आज मला भेटायला येऊ शकतो अशी माहिती पोलिसांना देताना तिने त्याचा उल्लेख जहन्नूम केला होता.
का केला खालिदचा गेम?
इंडियाटुडेने दिलेल्या वृत्तानुसार, वर्षभरापूर्वी आपण गर्भवती असल्याचं तरूणीच्या लक्षात आलं. याबाबत तिने खालिदला सांगितलं तर त्याने तिच्याशी थेट संबंध तोडला. मला तुझ्याशी आणि तुझ्या पोटातील बाळाशी काही देणंघेणं नाही असं तो तिला म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून तिला धक्का बसला, त्यानंतर ती बहिणीसोबत थेट जालंधरला पोहोचली आणि तिथे इच्छा नसताना गर्भपात केला. त्यानंतर खालिदचा बदला घ्यायचा याच रागातून ती परतली आणि खालिद आज सकाळी मला भेटायला येऊ शकतो अशी माहिती देऊन तिने खालिदचा गेम केला. माहिती मिळाल्यानंतर बारामुल्लाच्या लाडोरा येथे सैन्याच्या तुकडीने खलिदला घेरले होते.
अनेक तरूणींशी संबंध-
या तरूणीव्यतिरीक्त खालिदचे अनेक तरूणींसोबत संबंध होते. त्याने तीन ते चार तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धोका दिला होता अशी माहिती आहे.
कोण होता खालिद ?
खालिद हा मूळचा पाकिस्तानचा असून त्याने पाकिस्तानमध्येच दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर त्याने भारतात घुसखोरी केली होती. खालिद हा जैश-ए- मोहम्मदचा उत्तर काश्मीरमधील ऑपरेशनल कमांडर होता. खालिद ऑक्टोबर 2016 पासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. बारामुल्ला येथे ‘जैश’चे मॉड्युल सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केले होते. यात खलिदचे नावही समोर आले होते. गेल्या आठवड्यात श्रीनगरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर ‘जैश’च्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात तीन जवान जखमी झाले होते. तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. खालिद या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, असे समजते. मॉस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.