Yaas Cyclone: ‘यास’ : प. बंगाल, ओडिशासह ६ राज्यांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:33 AM2021-05-25T06:33:04+5:302021-05-25T06:33:49+5:30
Yaas Cyclone Update: आगामी २४ तासांत अतिशय भीषण चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या वादळात प्रतितास १५५-१६५ कि.मी. ते १८० कि.मी. याप्रमाणे हवेचा वेग असेल. चक्रीवादळाला ‘यास’ हे नाव ओमानने दिले आहे.
नवी दिल्ली : ‘यास’ चक्रीवादळ आगामी २४ तासांत गंभीर रूप धारण करू शकते. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने प. बंगाल, ओडिशासह अन्य सहा राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, तसेच प. बंगाल आणि ओडिशात पावसाचाही इशारा दिला आहे.
हवामान विभागाने सांगितले की, आगामी २४ तासांत अतिशय भीषण चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या वादळात प्रतितास १५५-१६५ कि.मी. ते १८० कि.मी. याप्रमाणे हवेचा वेग असेल. चक्रीवादळाला ‘यास’ हे नाव ओमानने दिले आहे. याचा उच्चार याश असाही केला जातो. हा पर्शियन शब्द असून, त्याचा अर्थ यास्मिन असा आहे. मराठीत यास्मिन म्हणजे चमेलीचे फूल. वादळांना विविध देश नाव देतात. यावेळी क्रमाने ओमान होता. याआधी अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाला तौउते वा तौटे हे नाव म्यानमारने दिले होते.