उत्तर प्रदेशात यादवी!
By admin | Published: December 31, 2016 05:22 AM2016-12-31T05:22:53+5:302016-12-31T05:22:53+5:30
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या यादीत आपल्या समर्थकांना डावलल्याने बंडाचा पवित्रा घेताच, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपले पुत्र
लखनौ : विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या यादीत आपल्या समर्थकांना डावलल्याने बंडाचा पवित्रा घेताच, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपले पुत्र आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीच शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे उत्तर प्रदेशात राजकीय संकट निर्माण झाले आहे. मुलायमसिंग यांनी आपले बंधू रामगोपाल यादव यांनाही पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला.
या घटनेमुळे सपामध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून, येत्या निवडणुकांत वडील व मुलगा यांचे पक्ष आमनेसामने येणार आणि त्यांच्या फुटीचा भाजपा वा बसपा यांना फायदा मिळणार, हे स्पष्ट झाले आहे. मुलायमसिंग वा अखिलेश यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. त्यासाठी अखिलेश यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक उद्या, शनिवारी सकाळी ९ वाजता बोलावली आहे. मात्र रात्रभरात मुलायमसिंग यांच्याकडूनही काही घडामोडी घडतील. आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न दोन्ही बाजू करीत आहेत.
शिवपाल यादव कानात पुटपुटले अन्...
- मुलायमसिंग यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत आपल्या समर्थकांची नावे नसल्याचे लक्षात येताच, अखिलेश यांनी काल रात्री २३५ जणांची यादी जाहीर केली आणि तेव्हाच उत्तर प्रदेशच्या सत्ताधारी पक्षात वादाची पुन्हा ठिणगी पडली.
अखिलेश यांचे हे कृत्य म्हणजे बंड असून, त्यामागे आपले बंधू रामगोपाल यादव असल्याचे मुलायम यांच्या लक्षात आले. त्यामुळे संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषेदत रामगोपाल यांच्या निलंबनाची घोषणा केली.
पत्रकार परिषद सुरू असतानाच, शिवपाल यादव मुलायमसिंग यांच्या कानात काही
तरी पुटपुटले आणि दुसऱ्याच क्षणी अखिलेश यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करीत आहोत, अशी घोषणा मुलायमसिंग यांनी करून टाकली.
अखिलेश बंडामागे सावत्र बंधू प्रतीकचे कारण
अखिलेश यांनी बंडाची तयारी करतानाच, विधानसभा निवडणुकांत प्रसंगी काँग्रेसशी समझोता करण्याची तयारी चालवली होती, असे सांगण्यात येते. दुसरीकडे मुलायमसिंग यांनी सपा कोणाशीही आघाडी वा समझोता करणार नाही, असे जाहीर केले होते. तसेच सत्ता आल्यास अखिलेशच मुख्यमंत्री होतील, असेही सांगायला ते तयार नव्हते. नव्याने निवडून आलेले आमदारच नवा मुख्यमंत्री ठरवतील, असे ते सांगत होते. त्यामुळे सावत्र बंधू प्रतीकला मुख्यमंत्री करण्याचा वडिलांचा प्रयत्न असल्याचे अखिलेश यांना वाटत होेते.
राष्ट्रपती राजवट लागणार का?
अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने घडलेल्या घटनेमुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागणार का, की अखिलेश यादव आपल्या समर्थक आमदारांच्या जोरावर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार की अखिलेशच्या जागी नव्या नेत्याची निवड करून आपल्या मुलाचेच सरकार मुलायमसिंग पाडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
वडिलांच्या तब्येतीसाठी हानिकारक
मुलायमसिंग यांच्या निर्णयाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अखिलेश यांनी नकार दिला. जे काही घडले, ते वडिलांच्या तब्येतीसाठी हानिकारक आहे, एवढेच ते म्हणाले.
काका-पुतण्याच्या वादातून पडली ठिणगी
विधानसभेच्या उमेदवारांवरून पक्षात फूट पडली असली तरी गेले काही महिने यादव कुटुंबातील भांडणाची लक्तरे वेशीवरच टांगली गेली होती. त्यातूनच मुलायमसिंग यांनी आधीही रामगोपाल यांना पक्षातून काढले होते, तर अखिलेश यांनी काका शिवपाल यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता.
शिवपाल व मुलायमसिंग एकीकडे, तर रामगोपाल यादव व अखिलेश दुसरीकडे असे चित्र तेव्हापासूनच दिसत होते. ती भांडणे मिटवल्यासारखे मध्यंतरी भासवण्यात आले खरे, पण ती मिटली नव्हती आणि त्यातून अखेर बापाने मुलालाच पक्षातून बाहेर काढले.
त्यामुळे सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षात फूट पडली असून, ती मिटण्याची आता चिन्हे नाहीत. किंबहुना एका कुटुंबातील भांडणे विकोपाला गेल्यानेच सरकार जाण्याची वेळ समाजवादी पक्षावर आली आहे.
- राज्यपाल राम नाईक यांनी आपण घटनांवर लक्ष ठेवून आहोत, असे म्हटले आहे. राज्यात घटनात्मक नव्हे, तर राजकीय संकट निर्माण झाले आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले आहे.