यादवी! मुख्यमंत्री अखिलेश यांची सपातून हकालपट्टी

By admin | Published: December 30, 2016 06:50 PM2016-12-30T18:50:09+5:302016-12-30T21:26:23+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Yadavee! Chief Minister Akhilesh's expulsion from SP | यादवी! मुख्यमंत्री अखिलेश यांची सपातून हकालपट्टी

यादवी! मुख्यमंत्री अखिलेश यांची सपातून हकालपट्टी

Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 30 - काका शिवपाल  आणि वडील मुलायम सिंग यादव यांच्याविरोधात बंडाचे निषाण फडकवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम यांनी अखिलेश यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केल्याचे आज संध्याकाळी जाहीर केले. अखिलेश यांच्याबरोबरच पक्षात सुरू असलेल्या यादवीत अखिलेश यादव यांच्या बाजूने उभे असलेले रामगोपाल यादव यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अखिलेश यांच्या हकालपट्टीमुळे समाजवादी पक्षात उभी फूट पडली असून, अखिलेश यांच्या अनेक समर्थकांना पक्षास सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली आहे. तर रामगोपाल यादव यांनी अखिलेश यांची पक्षातून केलेली हकालपट्टी असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर सपामध्ये पुन्हा एकदा यादवीला तोंड फुटले होते. त्या पार्श्वभूमीवर रामगोपाल यादव यांनी 1 जानेवारीला समाजावादी पक्षाचे प्रतिनिधी संमेलन बोलावल्याने हा वाद अधिकच चिघळला. दरम्यान, बंडाचा पवित्रा घेणाऱ्या रामगोपाल आणि अखिलेश यांना मुलायम सिंग यांनी कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. त्यानंतरही वादा विकोपाला गेल्याने आज संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावून मुलायम यांनी अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. 
मुलायम म्हणाले, "रामगोपाल यादव यांना प्रतिनिधी संमेलन बोलावण्याचा कोणताही अधिकार नाही. हा अधिकार केवळ राष्ट्रीय अध्यक्षाला असतो. रामगोपाल यांनी शिस्तभंग केला आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात येत आहे."
यावेळी  रमागोपाल यादव हे अखिलेशचे राजकीय भविष्य संपुष्टात आणत असल्याचा आरोपही मुलायम यांनी केला. "रामगोपाल अखिलेशचे भवितव्य संपुष्टात आणत आहेत. ते त्याला कमकुवत करत आहेत, पण ही बाब अखिलेशच्या लक्षात येत नाही आहे. आता पक्ष वाचवण्यासाठी अखिलेश यांचीही पक्षातून हकालपट्टी करत आहे, आता उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होईल हे मी ठरवेन, अखिलेश यांना बहुमत सिद्ध करावे लागेल. अखिलेश केलेल्या कृत्याबाबत माफी मागणार काय? तो तर माझ्याशी भांडतोय. आता ते माफी मागतील तेव्हा पुढचे पुढे पाहिले जाईल," असे मुलायम सिंग यांनी सांगितले. 
 
  पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर अखिलेश यांच्या घराबाहेर समर्थकांनी गर्दी केली आहे. तसेच अखिलेश हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर  रामगोपाल यादव यांनी मुलायम यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. अखिलेश यांची हकालपट्टी असंवैधानिक आहे. तसेच पक्षात सर्वकाही असंवैधानिक पद्धतीने सुरू आहे, असा आरोप रामगोपाल यांनी केला आहे. आता अखिलेश यांनी उद्या सकाळी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. तसेच समाजवादी पक्ष माझा आहे. मी स्वबळावर निवडणूक लढू शकतो, असे अखिलेश यांनी एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

Web Title: Yadavee! Chief Minister Akhilesh's expulsion from SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.