येत्या 15 दिवसांत टोमॅटो होणार स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 08:11 PM2017-07-30T20:11:39+5:302017-07-30T20:13:52+5:30
टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
नवी दिल्ली, दि. 30 - टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र येत्या 15 दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईल, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) मांडलं आहे. दक्षिण आणि अन्य राज्यांतून टोमॅटोची आवक येत्या काळात वाढणार असल्याचंही समजतं आहे.
टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागात टोमॅटोचे दर एक महिन्यापासून गगनाला भिडलेत. किरकोळ विक्रीत हे दर किमान 100 रुपये किलो आहेत. मंत्रालयाच्या 29 जून रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 92 रुपये किलो, कोलकात्यात 95 रुपये, मुंबईत 80 रुपये आणि चेन्नईत 55 रुपये किलो असे दर आहेत. अन्य शहरात लखनऊमध्ये 95 रुपये, भोपाळ व तिरुवनंतपुरम 90 रुपये, अहमदाबाद 65 रुपये, जयपूर 60 रुपये, पाटणा 60 रुपये आणि हैदराबाद 55 रुपये किलो असे दर आहेत.
ज्या भागात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन होते त्या भागातही दर वाढलेले आहेत. शिमला येथे 83 रुपये, बंगळुरुत 75 रुपये किलोने विक्री होत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (फलोत्पादन विभाग) ए. के. सिंह यांनी सांगितले की, दक्षिण आणि अन्य उत्पादक राज्यांतून आवक वाढल्यानंतर येत्या 15 दिवसांत टोमॅटोचे दर खाली येतील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांतून आवक वाढू शकेल. त्यामुळे साहजिकच दर कमी होतील. सिंह यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि राजस्थान व अन्य उत्पादक राज्यांत झालेल्या मुसळधार पावसाने टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. तसेच मालवाहतुकीशी संबंधित काही समस्यांमुळे टोमॅटो वेळेवर बाजारात आले नाहीत.
पाऊस आणि पूर यामुळे भाजी मंडईत भाजीपाला घेऊन येण्यासाठी वेळ तर लागत आहे. दिल्ली टोमॅटो मर्चेंट असोसिएशनचे अशोक कौशिक यांनी सांगितले की, मालवाहतुकीसाठी अधिक वेळ लागत असल्याने खर्चात वाढ होत आहे. येत्या दोन आठवड्यांत आवक वाढू शकेल. 2016-17 या वर्षात म्हणजेच जुलै ते जून या काळात देशात टोमॅटोचे उत्पादन 15 टक्के अधिक 187 लाख टन होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्याच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतरच वास्तविक आकडेवारी समोर येईल.