देशाच्या संरक्षणासाठी आता ‘यज्ञयागा’चा आधार, भाजपा खासदाराचे देशभरातील ब्राह्मणांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:32 AM2018-01-23T01:32:02+5:302018-01-23T01:56:06+5:30
सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती थोपविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने देशाच्या संरक्षणासाठी आता यज्ञयागाचा आधार घेतला आहे.
नवी दिल्ली : सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती थोपविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने देशाच्या संरक्षणासाठी आता यज्ञयागाचा आधार घेतला आहे.
पाकच्या गोळीबारात जवान आणि नागरिकांचे जीव जात असताना, सत्ताधारी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पूर्व दिल्लीचे खासदार माहीश गिरी यांनी १८ ते २५ मार्चदरम्यान लाल किल्ल्यासमोरील मैदानावर देशभरातील ब्राह्मणांना बोलावून १०८ यज्ञांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद या कार्यक्रमातील प्रमुख निमंत्रित आहेत. चीन, पाकिस्तानसारख्या बाह्य शत्रूंपासून आणि अंतर्गत हितशत्रूंपासून देशाचे संरक्षण व्हावे, देशाची अर्थव्यवस्था सुधारावी, भारतीयांची बौद्धिक क्षमता वाढावी, यासाठी हा महायज्ञ करण्यात येणार असल्याचे गिरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, तसेच डोकलाम, पूंछ आदी अस्वस्थ सीमा भागातून माती
आणि पाणी आणून यज्ञशाळा उभारण्यात येणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.
श्री योगिनी पीठाच्या छत्राखाली आठ दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात हे १०८ यज्ञ होणार असून, त्यात देशभरातील ११११ ब्राह्मण, माँ पारंबा भगवती बगलमुखी यांना आहुती देणार आहेत. या कार्यक्रमासाठी वैदिक ग्राम उभारणीची जबाबदारी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे, तसेच शंकर महादेवन आणि कैलाश खैर कार्यक्रमासाठी गाणे तयार करणार आहेत. या यज्ञात मोठ्या प्रमाणात तूप हवी केले जाणार असून, हे तूप देशभरातील घराघरांत फिरून गोळा केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात रथयात्रा काढण्यात येणार आहे.
नितीन देसार्इंकडे काम-
वैदिक ग्राम उभारणीची जबाबदारी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.