याकूब मेमनचा राष्ट्रपतींकडे पुन्हा दया अर्ज
By admin | Published: July 29, 2015 12:26 PM2015-07-29T12:26:54+5:302015-07-29T15:21:36+5:30
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला याकूब मेमन याने राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे पुन्हा दयेचा अर्ज दाखल केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला याकूब मेमन याने राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे पुन्हा दयेचा अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याकूबला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र त्यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच याकूबने राष्ट्रपतींकडेही अर्ज केला आहे. त्यामुळे याकूबला उद्या, म्हणजेच गुरूवार, ३० जुलै रोजी फाशी होण्याची शक्यता कमी आहे.
याकूबने दाखल केलेल्या याचिकेवर आज त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होत असून त्यानंतरच याकूबच्या फाशीबाबत फैसला होईल. मात्र ती सुनावणी सुरू असतानाच याकूबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी त्याच्या कुटुंबियाकडून राष्ट्रपतींकडे दया अर्ज करण्यात आला होता, तो फेटाळण्यात आला होता. मात्र आज स्वत: याकूबनेच अर्ज दाखल करत दया मागितली आहे.
फाशीच्या शिक्षेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी याकूबकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याने गेल्याच आठवड्यात राज्यपालांकडेही दयेची याचिका केली होती. यापूर्वी याकूबने दाखल केलेली फेरविचार याचिका तीन सदस्यीय पीठाने फेटाळली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा त्याने सर्वोच्च न्यायालयात निर्णय क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली. त्यावर २१ जुलैला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने तीही याचिका फेटाळून लावली.