यमुना एक्स्प्रेस वे तीन तासांत पार करून बघा...पुढे काय होते?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 05:28 PM2019-07-01T17:28:38+5:302019-07-01T17:30:02+5:30
लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर वाहनांचा अतिवेग अपघातांचे कारण बनला आहे.
लखनऊ : लखनऊ-आग्रा हा एक्स्प्रेस हायवे बनल्यापासून त्यांच्या वैशिष्ट्यांपेक्षा अपघातांच्या मालिकांसाठी ओळखला जात आहे. या हायवेवरून लढाऊ विमानेही उडविण्यात आली आहेत. असा हा देशातील पहिलाच हायवे आहे. मात्र, या हायवेवर अपघातही एवढे भीषण होत आहेत की थांबण्याचे नाव घेत नाहीत. अखेर उत्तर प्रदेश एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणाने कंबर कसली असून हा हायवे सुरू झाल्यापासून पुढील तीन तासांच्या आत हायवे पार केल्यास कारवाई केली जाणार आहे. गेल्या दोन दिवसांत 25 जणांना चलन पाठविण्यात आले आहे.
लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर वाहनांचा अतिवेग अपघातांचे कारण बनला आहे. आतापर्यंत या हायवेवर 250 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. यामुळे पूपीडाने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आग्राच्या बाजुला 21 किमी आणि लखनऊच्या बाजुला 290 किमीच्या अंतरावर अत्याधुनिक कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे वेगावर लक्ष ठेवण्याबरोबरच वाहनाची नंबरप्लेटही नोंद करू शकणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीश कुमार अवस्थी यांनी सांगितले की, ही व्यवस्था 28 जूनपासून सुरू करण्यात आली आहे. 302 किमीच्या एक्सप्रेसवे जी वाहने तीन तासांच्या आत पार करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कारसाठी 100 किमी, ट्रक आणि अन्य जड वाहनांसाठी 60 किमी प्रतितासाचा वेग निर्धारित करण्यात आला आहे. या वेगाचे उल्लंघन केल्यास वाहनांची माहिती लखनऊ आणि आग्रा पोलिसांना ईमेलद्वारे पाठविण्यात येते. दोन्ही जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती आधीच देण्यात आली आहे.