"लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलिंडरचे वाढवले भाव"; मोदी सरकारला सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:06 PM2021-10-21T17:06:26+5:302021-10-21T17:08:20+5:30
Yashomati Thakur slams Modi Government : महागाईवरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price) च्या किंमती दररोज नवा विक्रम करत आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 21 ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. देशातील सर्व राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढवण्यात आले होते. सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. यासोबतच सिलिंडर, अन्नधान्य, भाज्या यांचे भाव देखील सातत्याने वाढत आहेत. याच दरम्यान महागाईवरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे.
"सिलिंडरचे भाव यासाठी वाढलेत कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा, डिझेल पेट्रोलचे भाव यासाठी वाढलेत की कोरोना काळात लोकांनी बाहेर पडू नये" असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच 'अच्छे दिन' आणणाऱ्या लोकांनीच 'महागाईचे दिन' आणले असं म्हणत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "महागाई वाढवणारं सरकार केंद्रात सत्तेत आहे. मग कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय? सगळं काही महाग झालं आहे. अच्छे दिन आणणारे लोक महागाईचे दिन आणत आहेत. यावर मी आता काय बोलू?" असं म्हणत ठाकूर यांनी टीका केली आहे.
"कोरोना काळात लोकांनी बाहेर पडू नये यासाठी डिझेल-पेट्रोलचे भाव वाढलेत"
“सिलिंडरचे भाव यासाठी वाढलेत कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा. तेलाचे भाव यासाठी वाढले आहेत कारण लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं. डिझेल पेट्रोलचे भाव यासाठी वाढलेत की कोरोना काळात लोकांनी बाहेर पडू नये. अशी स्पष्टीकरण केंद्र सरकार देणार असेल तर यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल" असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. एका वेबसाईटला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 15 पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 4.80 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल 5 रुपयांनी वाढले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढताहेत
कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 106.54 रुपये प्रति लिटरवर गेला आहे तर डिझेल 96.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 33 पैशांनी वाढ झाली असून आता ते 112.44 कुरए प्रति लिटर दराने विकले जात आहे. तसेच, डिझेलच्या किंमतीमध्येही 37 पैशांनी वाढ झाली असून आता ते 103.26 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.