Presidential election 2022: “उद्धव ठाकरेंनी दबाव असल्यामुळेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिलाय”; यशवंत सिन्हांची तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:34 AM2022-07-14T11:34:50+5:302022-07-14T11:35:44+5:30
Presidential election 2022: देशभरातील विरोधकांपैकी केवळ शिवसेनेनेच एनडीएला पाठिंबा दिला, असे यशवंत सिन्हा यांनी गुवाहाटीत बोलताना सांगितले.
गुवाहाटी: राज्यात एकीकडे सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election 2022) रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेरीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. यावरून आता विरोधकांचे उमेदवार असलेल्या यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असल्यानेच त्यांनी माझ्याऐवजी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.
गुवाहाटीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यशवंत सिन्हा यांनी उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पाठिंब्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली. राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला आहे. केंद्र सरकार राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
विरोधकांपैकी एकच पक्ष एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देतोय
तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी मला पूर्णपणे समर्थन देत आहेत. आम आदमी पक्षही लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मला या सर्व गोष्टींची कल्पना आहे. विरोधकांच्या गोटातील फक्त एकच पक्ष एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे तो म्हणजे शिवसेना. तेलंगण राष्ट्र समिती विरोधकांच्या बैठकीत सहभागी नव्हते, तरीही मला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आमच्याकडे मोठा पाठिंबा आहे, असा विश्वास यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केला.
दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी एका आदिवासी उमेदवाराला देशाचे राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण पाठिंबा द्यायला हवा अशी विनंती माझ्याकडे केली. शिवसेनेने याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.