मोदींच्या व्यासपीठावर यशवंत सिन्हा नाहीत? पीएमओतून आले शिष्टाचार पालनाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:36 AM2017-10-11T00:36:26+5:302017-10-11T00:37:13+5:30
१४ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या पाटणा विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना मात्र व्यासपीठावर स्थान मिळणार नसल्याचे समजते.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : १४ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या पाटणा विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना मात्र व्यासपीठावर स्थान मिळणार नसल्याचे समजते़
मोदी यांच्या या दौ-यात शिष्टाचाराचे पालन केले गेले पाहिजे, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले असल्याचे समजते. तशा सूचना संबंधितांना दिल्या गेल्या आहेत़ मोदी यांच्यासमवेत व्यासपीठावर फक्त आवश्यक तेवढ्याच सन्माननीय व्यक्ती असतील, असे सांगण्यात आले आहे़ आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, अन्नपुरवठामंत्री रामविलास पासवान, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे आदी हे या विद्यापीठाचे विद्यार्थी असून, त्यांनाही या कार्यक्रमास बोलावण्यात आले आहे. माजी केंद्रीय आरोग्य मंत्री व विद्यमान राज्यसभा सदस्य सी. पी. ठाकूर हेही विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. यशवंत सिन्हा यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती़ त्याला शत्रुघ्न सिन्हा यांनीही पाठिंबा दिला होता़ त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने दोघांना व्यासपीठापासून दूर ठेवण्याच्या सूचना केल्याचे कळते़
आयोजकांची होणार पंचाईत-
शिष्टाचारानुसार व्यासपीठावर मोजक्याच खुर्च्या असतील. त्यात पंतप्रधान, राज्यपाल सतपाल मलिक, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जे. पी. नड्डा, चौबे यांचा समावेश आहे.
दोन्ही सिन्हांना महत्त्वाचे स्थान मिळणार की नाही आणि सी. पी. ठाकूर यांना कोठे सामावून घेणार का, हे स्पष्ट नाही. यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा यांना व्यासपीठावर उपस्थित राहावे अशी विनंती या दोन नेत्यांना करणाºया आयोजकांचीच पंचाईत होणार आहे.