मोदींनी भाजपात सर्वांना मॅनेज केलंय, यशवंत सिन्हा यांनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:14 PM2019-02-05T13:14:42+5:302019-02-05T13:15:53+5:30
भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली- भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी सर्वांना मॅनेज करून ठेवलं आहे. मोदींविरोधात कोणीही आवाज उठवणार नाही. यशवंत सिन्हा यांनी 2014च्या ऐतिहासिक बहुमताचा हवाला देत सांगितलं की, जनतेनं जबरदस्त जनादेश दिला होता, परंतु नंतर सर्वच गोष्टींची वाट लागली. सिन्हा यांनी लालकृष्ण अडवाणी अध्यक्ष असतानाच्या आठवणींनाही उजाळा दिला.
एका मुलाखतीत ते म्हणाले, चंद्रशेखर आणि अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये अर्थमंत्रिपद सांभाळलेले सिन्हा म्हणाले, 2014मध्ये भाजपाला चांगला जनाधार मिळाला होता. परंतु आता सर्वच गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. आता भाजपामध्ये कोणीही आवाज उठवण्याची हिंमत करत नाही. मोदींनी सर्वांना मॅनेज करून ठेवलं आहे. अडवाणींच्या कार्यकाळात असं काही नव्हतं. सर्वजण पक्ष कार्यालयात सकाळी 11 वाजता पोहोचत होते. त्यानंतर अनेक मुद्द्यांवर चर्चा होत होती. सर्व गोष्टींवर विचारविनिमय करून निर्णय घेतले जात होते. नोटाबंदीच्या निर्णयापासून मोदींनी जनतेचा भ्रमनिरास करण्यास सुरुवात केली.
नोटाबंदीचा निर्णय हा मूर्खपणा होता. यशवंत सिन्हा गेल्या काही दिवसांपासून मोदी आणि शाहांवर टीका करत सुटले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशमध्येही सपा आणि बसपाला काँग्रेसला महाआघाडीत घेण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून भाजपाला उत्तर प्रदेशात जास्त जागा जिंकता येणार नाहीत.