हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर यासीन इटूचा एन्काऊंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 08:21 AM2017-08-14T08:21:52+5:302017-08-14T09:21:57+5:30
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेचा कमांडर यासीन इटू उर्फ गजनवीचा जवानांनी खात्मा केला आहे. यासीन इटूचा खात्मा म्हणजे दहशतवादी संघटनांना मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
श्रीनगर, दि. 14 - दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेचा कमांडर यासीन इटू उर्फ गजनवीचा जवानांनी खात्मा केला आहे. यासीन इटूचा खात्मा म्हणजे दहशतवादी संघटनांना मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या चकमकीत महाराष्ट्रातील एका जवानासह दोन जवान शहीद झाले आहेत. अकोल्यातील जवान सुमेध गवई आणि तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांना वीरमरण आले आहे. जिल्ह्यातील अवनीरा गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू पोलीस, सीआरपीएफ आणि 55 राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.
शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 5 जवान जखमी झाले, यातील दोन जवानांना वीरमरण आले. शनिवारी संपूर्ण रात्रभर ही चकमक सुरू होती. दरम्यान, या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर यासिन इटू उर्फ गजनवीसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन इटू हा मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील राहणार होता. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खो-यात उफाळून आलेला हिंसाचार, अशांती कायम राखण्यासाठी त्याचा मुख्यतः समावेश होता. भारतीय सैन्याने जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत यासीन इटूचा A प्लस यादीतही समावेश होता. यासीन इटू हा बुरहान वाणीचा जवळचा मानला जायचा. त्यामुळे यासीन इटूचा खात्मा भारतीय जवानांसाठी मोठं यश मानले जाते आहे.
Delhi: Army chief Bipin Rawat paid tribute to Sepoy Ilayaraja P & Sepoy Gowai Sumedh Waman who lost their lives in Shopian encounter. pic.twitter.com/lDtWWdYKxK
— ANI (@ANI) August 13, 2017
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार
4 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी ठार मारला गेला. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले. यानंतर एन्काऊंटरमध्ये एका बाईकस्वाराला ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल, चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे.
दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद
3 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा
1 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात.