2017 मध्ये भारतीय लष्कराने घातले तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 04:53 PM2018-01-10T16:53:21+5:302018-01-10T16:56:05+5:30
सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने 2017 मध्ये तब्बल...
नवी दिल्ली/जम्मू - सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडल्या. त्यात दोन्हीकडच्या सैन्याची जीवितहानी झाली. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने 2017 मध्ये तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सरकारशी संबंधित असलेल्या गुप्तहेर खात्यामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
2017 मध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. त्याला भारतीय लष्कराकडूनही वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले गेले. या कारवाईमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या. काही वेळा भारतीय लष्कराने केलेली कारवाई एवढी तीव्र होती की, पाकिस्तानला पांढरे निषाण फडकवून सीजफायरसाठी विनवणी करावी लागली.
सीमारेषेजवळून पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारतीय लष्कराकडून सप्टेंबर 2017 मध्ये ऑपरेशन अर्जुन चालवण्यात आले होते. त्यावेळी भारतविरोधी कारवायांना मदत करणारे पाकिस्तानचे माजी सैनिक, आयएसआय आणि रेंजर्समधील अधिकाऱ्यांची घरे आणि निवासस्थानांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईनंतर भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणे पाकिस्तानला भाग पडले होते.
त्यानंतर डिसेंबर महिन्यात भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या ताब्यातील भागात 250 ते 300 मीटर आत प्रवेश करून आपल्या चार सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. मात्र ही सर्जिकल स्ट्राइकसारखी मोठी कारवाई नव्हती. पण लष्करी विभागात सिलेक्टिव्ह टार्गेटिंग असे नाव दिलेल्या या कारवाईत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर हल्लीच बीएसएफने आपल्या एका सैनिकाच्या मृत्यूचा बदला 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून केला होता.
याशिवाय गेल्या वर्षभरात लष्कराने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी ऑपरेशन ऑलआऊट सुरू केले आहे, या अभियानांतर्गत लष्कराने दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले होते.