कारवाईची वर्षपूर्ती : गरज पडल्यास पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’,भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:43 AM2017-09-08T01:43:27+5:302017-09-08T01:43:56+5:30
शेजारी देशाने सीमापार दहशतवादी कारवायांना मदत करणे थांबविले नाही, तर भारतीय लष्कर सीमा ओलांडून पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यास मागेपुढे पाहणार नाही
श्रीनगर : शेजारी देशाने सीमापार दहशतवादी कारवायांना मदत करणे थांबविले नाही, तर भारतीय लष्कर सीमा ओलांडून पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. अम्बू यांनी गुरुवारी पाकिस्तानचे थेट नाव न घेता दिला.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी प्रशिक्षण तळांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उधमपूर येथील कमांड मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना जनरल अम्बू म्हणाले, प्रत्यक्ष सीमा रेषाही ओलांडली जाऊ शकते, असा स्पष्टच संदेश शेजारी देशाला देण्यासाठीच ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्या गेल्या होत्या व गरज पडल्यास भारतीय लष्कर पुन्हा एकदा सीमा ओलांडायला जराही मागे हटणार नाही. भारतीय लष्कर गरजेनुसार केव्हाही व कुठेही सीमापार आघात करायला पूर्णपणे सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल अम्बू यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रे व रसद पुरवून प्रत्यक्ष कामगिरीवर रवाना करणारी ‘लॉन्च पॅड््स’ कमी होण्याऐवजी वाढली आहेत. आजही सीमेच्या पलीकडे पीर पांजाळ पर्वतराजीच्या दक्षिणेस व उत्तरेस अशी प्रशिक्षण केंद्रे व ‘लॉन्च पॅड््स’ मोठ्या संख्येने अस्तित्वात आहेत, अशी कबुली जनरल अम्बू यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
असे असले तरी काश्मीर खोºयात सीमेच्या पलीकडून होणारी घुसखोरी कमी झाली आहे, असा दावा करून ते म्हणाले की, आजही दहशतवाद्यांचे सीमेवरून खोºयात घुसखोरी करण्याचे प्रयत्न वारंवार सुरू असतात. पण बव्हंशी प्रयत्न लष्कराकडून वेळीच हाणून पाडले जातात. (वृत्तसंस्था)
काश्मीरप्रश्नी बंदुकीऐवजी चर्चा करावी
इस्लामाबाद : पाकिस्तानला दूषणे देणे आणि स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी झगडणाºया काश्मिरी जनतेवर बंदुका चालविण्याऐवजी काश्मीर समस्येवर राजकीय व राजनैतिक पातळीवर चर्चा करून तोडगा काढणे भारताच्या अधिक हिताचे आहे, असा शाहजोगपणाचा सल्ला पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दिला आहे.