जगावेगळं प्रेम, अनोखी श्रद्धांजली; वर्षभरापूर्वी शहीद पतीला निरोप देणारी 'ती' देशरक्षणासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 01:10 PM2020-02-19T13:10:54+5:302020-02-19T13:20:59+5:30
खडतर परीक्षा देऊन मेजर विभूती ढौंडियाल यांच्या पत्नी निकिता देशसेवेसाठी सज्ज
नवी दिल्ली: वर्षभरापूर्वी शहीद पतीला निरोप देणाऱ्या, शेवटच्या क्षणी त्यांच्या कानात हळूच 'आय लव्ह यू' म्हणणाऱ्या निकिता कौल ढौंडियाल आता त्यांच्या पतीप्रमाणेच देशसेवा करणार आहेत. पतीनं जो गणवेश घालून देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली, तोच गणवेश घालण्यासाठी निकिता सज्ज झाल्या आहेत. शहीद मेजर विभूती ढौंडियाल यांच्या पत्नी विभूती निकिता यांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) परीक्षा आणि मुलाखतीत उत्तीर्ण झाल्या असून सध्या त्या मेरिट लिस्टची वाट पाहत आहेत.
विभूती यांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत निकिता यांनी एसएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 'विभूती यांना परीक्षा देताना कसं वाटलं असेल, त्यांना कोणती भीती, चिंता, काळजी वाटली असेल, याचा विचार मीदेखील परीक्षा देताना करत होते. त्यातूनच मला ऊर्जा मिळत गेली,' अशा शब्दांत निकिता यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या.
मेजर विभूती ढौंडियाल पुलवामात १७ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. जवळपास २० तास त्यांनी दहशतवाद्यांचा मुकाबला केला. विभूती यांचं पार्थिव त्यांच्या देहरादूनमधल्या घरी आणलं गेलं, त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी रांग लागली होती. तुम्ही विभूतीकडून प्रेरणा घ्या, असं आवाहन त्यावेळी निकिता यांनी उपस्थितांना केलं होतं. निकिता स्वत: ते शब्द खरे ठरवतील, असं त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं.
'मी वेळ घेतला. कारण जे घडलंय ते स्वीकारण्यासाठी मला काही अवधी हवा होता. विभू अतिशय पुढारलेल्या विचारांचे होते. मी त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काहीतरी करावं असं त्यांना नेहमी वाटायचं. त्यामुळे मला जेव्हा जेव्हा लष्करात जाण्याच्या निर्णयाची भीती, चिंता वाटली, तेव्हा तेव्हा मी माझे डोळे बंद करून या परिस्थितीत विभू यांनी काय केलं असतं, त्याचा विचार केला. त्यामुळे माझ्या या निर्णयात विभू यांचा तितकाच सहभाग आहे,' अशा शब्दांत निकिता यांनी त्यांच्या लष्कर प्रवेशाच्या निर्णयाबद्दल सांगितलं.
शहीद जवानांच्या पत्नींना लष्करात सहभागी व्हायचं असल्यास त्यांच्यासाठी वयाची अट थोडी शिथिल केली जाते. मात्र निवड प्रक्रिया खडतरच असते. ही प्रक्रिया पूर्ण करून निकिता देशाच्या रक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत. 'एसएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मी खूप कष्ट घेतले. आता मला एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. सर्वांना अभिमान वाटेल, विभू यांना अभिमान वाटेल, असं काहीतरी करून दाखवायचं आहे,' अशा शब्दांत त्यांनी मनातल्या भावना बोलून दाखवल्या.