यंदा ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीत दिल्लीच नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ठरविली नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:48 AM2018-01-28T01:48:55+5:302018-01-28T01:49:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असले आणि नवी दिल्लीतून राज्यकारभार हाकत असले, तरी ते स्वत:ला देशाच्या राजधानीत उपरे समजत असावेत की काय, अशी शंका ‘पद्म’ पुरस्कारांच्या नावांतून येत आहे. नवी दिल्लीतील एकाही मान्यवराला यंदा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झालेला नाही.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असले आणि नवी दिल्लीतून राज्यकारभार हाकत असले, तरी ते स्वत:ला देशाच्या राजधानीत उपरे समजत असावेत की काय, अशी शंका ‘पद्म’ पुरस्कारांच्या नावांतून येत आहे. नवी दिल्लीतील एकाही मान्यवराला यंदा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झालेला नाही. असे ६४ वर्षांत प्रथमच घडले आहे. केवळ दिल्लीच नव्हे, तर एकूण १२ केंद्रशासित प्रदेश व राज्यांतील एकाही व्यक्तीचे नाव यंदाच्या ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीत नाही.
दक्षिण, पश्चिम व पूर्व भारतातील अनेक मान्यवरांची नावे या वर्षीच्या ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीमध्ये आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की, ज्यातील तब्बल १0 जणांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्या खालोखाल ज्या राज्यात यंदा निवडणूक आहे, त्या कर्नाटकातील ८ जण यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
ज्या तामिळनाडूमध्ये भाजपा पाय रोवू इच्छित आहे, तेथील ६ जण आणि केरळमधील ४ जण या यादीत आहेत. पश्चिम बंगालमधील ५ आणि ओडिशामधील चार जणांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
बिहार व झारखंडमधील प्रत्येकी तिघे या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या वर्षी तब्बल १६ परदेशी व्यक्तींना हे पुरस्कार देण्याचे जाहीर झाले आहेत. त्यापैकी १0 जण तर आशिअन देशांतील आहेत. या देशांच्या प्रमुखांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. अमेरिका व रशियातील प्रत्येकी एका व्यक्तीची ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी या वर्षी निवड करण्यात आली आहे. याखेरीज नेपाळ, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान व व्हिएतनाममधील प्रत्येकी एक जण ‘पद्म’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
शिफारशी नाकारल्या
नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या ‘पद्म’ पुरस्कारासाठीच्या नावांमध्ये बारीक लक्ष घातले होते. त्यामुळेच रा. स्व. संघाशी संबंधित पी. परमेश्वरन आणि डॉ. व्ही. पी. नंदा यांची निवड करण्यात आली. शिवाय योगा, आध्यात्म व पारंपरिक वैद्यकशास्त्र यांतील ६ जणांचा पद्मच्या यादीत समावेश करण्यात आला. यापूर्वी ‘पद्म’ पुरस्कारांसाठी निवड करताना राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सत्ताधारी पक्षाचे नेते यांच्या शिफारशींच्या नावांचा विचार केला जात असे. यंदा मात्र तुम्ही कोणाच्याही नावाची शिफारस करू नका, असे खासगीत सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुचविलेल्या नावांचाही विचार केला नव्हता, हे सर्वज्ञात आहे. यंदा गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या शिफारशी अमान्य करण्यात आल्या, असे समजते.