मंगळयानाला वर्ष पूर्ण; इस्रोने साजरा केला ‘बर्थ डे’
By Admin | Published: September 25, 2015 12:32 AM2015-09-25T00:32:30+5:302015-09-25T00:32:30+5:30
जागतिक पातळीवर ओळख निर्माण केलेल्या भारताच्या मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याला गुरुवारी वर्ष पूर्ण झाले आहे.
बंगळुरू : जागतिक पातळीवर ओळख निर्माण केलेल्या भारताच्या मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याला गुरुवारी वर्ष पूर्ण झाले आहे. इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने या यानाचा पहिला बर्थडे उत्साहात साजरा केला. या यानाचे इंधन अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकणार असल्यामुळे त्याचे आयुष्यही अनेक वर्षांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इस्रोने यानिमित्ताने मंगळावरील रंगीत कॅमेऱ्यातून मिळालेल्या प्रतिमा आणि अन्य पे-लोडच्या साह्याने मिळविण्यात आलेल्या छायाचित्रांचे संकलन असलेल्या ‘सायन्टिफिक अॅटलास’चे प्रकाशनही केले. मार्स आॅर्बिटर मिशनच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त इस्रोने ‘फिशिंग हॅमलेट टू मार्स’ हे पुस्तक ५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्याचे ठरविले
आहे.
५१ पैकी २१ मोहिमा यशस्वी
युरोपीयन अंतराळ संस्था, अमेरिकेची नासा आणि रशियाच्या रॉसकॉसमॉस या तीनच अंतराळ संस्थांना यापूर्वी मंगळावर यान पाठविण्यात यश मिळवता आले
आहे. भारताची मोहीम यशस्वी होण्यापूर्वी ५१ पैकी केवळ २१ मोहिमा यशस्वी होऊ शकल्या. मंगळयानावर आलेला खर्च ४५० कोटी रुपये म्हणजे ७.४ कोटी अमेरिकन डॉलर असून प्रत्यक्षात अपेक्षा १० कोटी अमेरिकन डॉलर एवढ्या खर्चाची होती. (वृत्तसंस्था)