यंदा पावसाची शंभर टक्के कृपा
By admin | Published: April 18, 2015 01:57 AM2015-04-18T01:57:23+5:302015-04-18T01:57:23+5:30
कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक शुभवर्तमान आहे.
शुभवर्तमान : जूनआधीच मान्सूनचे आगमन; शेतकऱ्यांना दिलासा; स्कायमेटचा अंदाज
नवी दिल्ली : कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक शुभवर्तमान आहे. यंदा मान्सूनचे आगमन २७ मेच्या आसपास होऊन जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी १०२ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तविली आहे.
सर्वसाधारणपणे ३० मेच्या आसपास दक्षिण केरळमध्ये नैर्ऋत्य मान्सून सक्रिय होतो. तो १ जूनपासून या राज्याच्या उत्तर भागाकडे वाटचाल करू लागतो. मुंबईला धडक देईपर्यंत १० जून ही तारीख आलेली असते. गेल्यावर्षी मुंबईत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनने हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दीर्घकालीन सरासरी जारी केलेली नाही. २३ एप्रिलच्या आसपास अधिकृतरीत्या अंदाज वर्तवला जाण्याची शक्यता आहे.
अल निनोचा प्रभाव नाही...
यावर्षी अल निनोचा मान्सूनवर प्रतिकूल परिणाम दिसणार नाही. समुद्राच्या पृष्ठभागापेक्षा सरासरी जास्त तापमान निर्माण झाल्यास अल निनोचा प्रभाव दिसतो. दक्षिण आशियात दुष्काळासाठी याच घटकाला जबाबदार मानले जाते. यावर्षी अल निनो सक्रिय झाला तरी संपूर्ण मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसणार नाही. तसेच हिंदी महासागरात द्विध्रुव परिस्थिती उत्पन्न होण्याचे संकेत नसल्याचे स्कायमेटने स्पष्ट केले आहे.
च्यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज असून, एप्रिलचा उर्वरित काळ आणि मेमध्येही अधूनमधून अवकाळी पावसाचा तडाखा बसेल. साधारणत: मेमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तुरळक हजेरी लावतात.
च्सध्याचे वातावरण पाहता उन्हाळ्यात पावसाची मालिका अशीच सुरू राहील. सध्याच्या वातावरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. उर्वरित एप्रिल आणि मेमध्ये देशभरात पावसाच्या सरी दिसतील, असे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीनसिंग यांनी सांगितले.
गुजरात-महाराष्ट्रात
मे महिन्यातच बरसणार
एप्रिलचा अखेरचा आठवडा ते मेच्या पहिल्या आठवड्याच्या काळात उन्हाळी पावसाचा प्रभाव जाणवेल. विशेषत: गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीत पाऊस झालेला असेल, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुजरातचा काही भाग आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. उत्तर आणि ईशान्य भारतात मान्सूनपूर्व पाऊस आणखी सक्रिय झालेला दिसेल़ याचा अर्थ अवकाळी पावसाला जोडूनच मान्सूनचे आगमन होईल.