यावर्षी कांदा रडवणार नाही
By admin | Published: March 31, 2016 03:25 AM2016-03-31T03:25:43+5:302016-03-31T03:25:43+5:30
यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन वाढणार असून, त्यामुळे तो यंदा महाग होणार नाही. सणासुदीच्या काळात तर तो अजिबातच रडवणार नाही.
नवी दिल्ली : यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन वाढणार असून, त्यामुळे तो यंदा महाग होणार नाही. सणासुदीच्या काळात तर तो अजिबातच रडवणार नाही.
कृषी, सहकार व शेती कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे यंदा देशात कांद्याचे उत्पादन नऊ टक्क्यांनी वाढणार आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण १0 टक्के असेल. गेल्या वर्षी म्हणजे २0१४-१५ मध्ये देशात कांद्याचे उत्पादन १८ हजार ९२७ टन इतके होते. त्याच्या आदल्या वर्षीच्या तुलनेत ते केवळ तीन टक्क्यांनी कमी होते. तरीही शेतकऱ्यांनी साठेबाजी आणि टंचाई निर्माण केल्याने परदेशातून कांदा आयात करावा लागला होता.
यावर्षी फेब्रुवारीपर्यंत २0 हजार ३३४ टन कांदा उत्पादन झाले आहे. मार्चपर्यंत ते २0 हजार ६३0 टनापर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी ५३६१ टन कांद्याचे उत्पादन झाले. यंदा ते ५८0३ टनावर जाईल, असा अंदाज आहे.
तेलंगणातही कांद्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही कांदा उत्पादनवाढीच्या वृत्ताला दुजोरा दिला. यंदा उत्पादन चांगले असून, भावही नीट मिळत आहे. मात्र काही दलाल या व्यवहारात गडबड करू पाहत आहेत, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्याने शेतकरी आणि ग्राहक यांना त्रास होणार नाही, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)