यंदा समाधानकारक पाऊस! भारतीय हवामान खात्याचा अंदाज
By admin | Published: April 18, 2017 03:50 PM2017-04-18T15:50:21+5:302017-04-18T15:50:21+5:30
यंदाच्या वर्षी देशातील पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, 18 - यंदाच्या वर्षी देशातील पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी वार्षिक सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवलेल्या मान्सूनच्या अंदाजाशी मिळताजुळता आहे. स्कायमेटने या वर्षी सरासरी 95 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे.
भारताची ६० टक्के लोकसंख्या ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सून कसा असणार याविषयी सर्वांनाच सर्वाधिक उत्सुकता असते. यंदा पर्जन्यमानाच्या दृष्टीने भारतासाठी हे वर्ष सर्वसामान्य वर्ष असेल. संपूर्ण देशभरात चांगला पाऊस होईल. यावर्षी देशाच्या वार्षिक सरासरीच्या 96 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
याआधी स्कायमेटचा यंदाच्या पर्जन्यमानाबाबतचा अंदाज प्रसिद्ध झाला होता. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेने वर्तवली होती. त्यात ५ टक्के कमी अधिक फरक पडू शकतो. देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवणार असल्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली होती.