एक वर्ष वाया गेले; ‘त्यांना’ शिक्षा करा!
By admin | Published: January 11, 2015 01:34 AM2015-01-11T01:34:25+5:302015-01-11T01:34:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले़ तुमचे एक वर्ष वाया घालविणाऱ्यांना शिक्षा द्या, असे आवाहन त्यांनी दिल्लीकरांना केले़
मोदींची केजरीवालांवर टीका : दिल्लीत प्रचाराचे रणशिंग फुंकले
अराजकवादी नेत्यांनी नक्षल्यांना सामील व्हावे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले़ तुमचे एक वर्ष वाया घालविणाऱ्यांना शिक्षा द्या, असे आवाहन त्यांनी दिल्लीकरांना केले़ त्यांचा रोख आम आदमी पार्टीकडे होता़
दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोदींची जाहीर सभा झाली़ या वेळी मोदींनी राजधानीत ४९ दिवसांचे सरकार चालविणारे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता, त्यांना जोरदार लक्ष्य केले़ स्वत:ला अराजकतावादी म्हणणारा नेता तुम्ही कधी पाहिला आहे का? अराजकता माजविणाऱ्यांनी जंगलात जाऊन नक्षल्यांमध्ये सामील व्हावे़ दिल्लीत नक्षलवाद चालू दिला जाणार नाही, असे मोदी या वेळी म्हणाले़
आम आदमी पार्टीकडून निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्यासारखी अनेक खोटी आश्वासने दिली जात आहेत. दिल्लीत ‘असत्याचा कारखाना’ जोरात सुरू आहे़ मोदी कुणी पाठीत खंजीर खुपसणारी व्यक्ती नाही़ ते खोटे बोलण्यात तरबेज आहेत़ म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे मोदी या वेळी म्हणाले़
केजरीवाल यांच्यावरही मोदींनी अप्रत्यक्ष हल्ला केला़ काम येते, त्यांना काम द्या आणि जे फुटपाथवर झोपण्यात, धरणे देण्यात निष्णात आहेत, त्यांना तेच करू द्या़ आम्ही चांगले सरकार देण्यात निष्णात आहोत, तेव्हा आम्हाला ती संधी द्या़ भाजपा केवळ स्थिर आणि सक्षम सरकार देईल़ हे सरकार दिल्लीकरांच्या वाया गेलेल्या एका वर्षाची भरपाई करेल़
एवढेच नव्हे, तर गत १५ वर्षांत (काँगे्रस शासनकाळ) अधुरी राहिलेली दिल्लीकरांची स्वप्नेही पूर्ण करेल, अशी ग्वाही या वेळी मोदींनी दिली़ २४ तास वीज देण्याचे, २०२२ पर्यंत दिल्लीतील प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्के घर देण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्लीकरांना दिले़
बँका श्रीमंतांच्या ताब्यात आहेत व गरिबांना त्यांचा लाभ होत नसल्याचा कांगावा करीत सुमारे ४० वर्षांपूर्वी काँग्रेसने बँकांचे राष्ट्रीयीकरण केले़ पण दुर्दैवाने यामुळे गरिबांचा कुठलाही फायदा झाला नाही़ सरकारच्या कब्जात आलेल्या बँका केवळ भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या़ आमच्या सरकारने जनधन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्सने गरिबांची बँकेत खाती उघडली़ आधी एक वर्षात एक कोटी खाती उघडली़ - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मुख्यमंत्र्यांचा ‘रामलीला’वर सत्कार
च्भाजपाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलिला मैदानावर फुंकण्यात आला.
च्त्यावेळी रामलीला मैदानावर झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), मनोहरलाल खट्टर (हरियाणा)व रघुवर दास (झारखंड)या भाजपाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा सत्कार दिल्ली प्रदेश भाजपाच्यावतीने करण्यात आला.
च् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘छत्रपतींचा आशीर्वाद करू नरेंद्र मोदींचा साथ,‘ या घोषणेने महाराष्ट्रात पक्ष सत्तेत आला. जे महाराष्ट्रात झाले तेच दिल्लीत झाले पाहिजे़
मोदींनी केवळ आश्वासने दिली -काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालवले असतानाच काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली़ नरेंद्र मोदी यांनी केवळ आश्वासने दिली, याउलट काँग्रेसने दिल्लीतील आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास केला, असे काँग्रेसने शनिवारी म्हटले़
काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी टिष्ट्वटरवरून मोदींना लक्ष्य केले़ पंतप्रधान मोठे वक्ते आहेत, पण त्यांनी केवळ आश्वासने दिलीत़ काँग्रेसच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात दिल्लीत सर्वाधिक विकास झाला, हे आमचे विरोधकही नाकारू शकत नाही़त मेट्रो, उड्डाणपूल आणि अन्य पायाभूत विकास काँग्रेस कार्याची पावती आहे अशा आशयाचे टिष्ट्वट त्यांनी केले़
मोदींनी आपल्या भाषणात जनधन योजनेचा उल्लेख केला़ तोच धागा पकडून सिंघवी यांनी दुसरे टिष्ट्वट केले़ रालोआ सरकारद्वारा उघडलेली ७५ टक्के खाती खाली आहेत, असे ते म्हणाले़ दिल्लीतील काँगे्रसच्या उपलब्धींच्या तुलनेत ‘आप’ एक फसलेला प्रयोग होता, असे सांगत सिंघवी यांनी आम आदमी पार्टीलाही लक्ष्य केले़