यंदा ‘योग दिनी’ सूर्यनमस्काराचा समावेश नाही
By Admin | Published: June 10, 2016 04:15 AM2016-06-10T04:15:29+5:302016-06-10T04:15:29+5:30
यंदा २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ‘सूर्यनमस्कार’ आसनाचा समावेश नसेल.
नवी दिल्ली : यंदा २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ‘सूर्यनमस्कार’ आसनाचा समावेश नसेल. योग ‘ॐ’च्या उच्चारणाशिवाय पूर्ण होत नाही. तथापि, नसले तरीही यंदा तेही अनिवार्य नसेल, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.
मागच्या वर्षीही ‘सूर्यनमस्कार’ या आसनाचा समावेश करण्यात आला नव्हता. सूर्यनमस्कार किचकट असून, नवीन लोकांसाठी ते ४५ मिनिटांत करणे जमत नाही. त्यामुळे आम्ही सूर्यनमस्काराचा समावेश केलेला नाही, असे सांगून त्यांनी
‘ॐ’चा घोषउच्चारण अनिवार्य
करण्यात आलेले नाही, हेही
नमूद केले.
काही चांगले काम होत असेल, तर त्याला विरोध होत असतो. या वर्षी मात्र याला विरोध झालेला नाही. आम्ही याला अनिवार्य केलेले नाही. विरोध करणाऱ्यांना आम्ही समजावून सांगितले आहे. त्यांना पटल्याचे दिसते. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना योगासंदर्भात आयुष मंत्रालयाच्या रूपरेषेचे पालन करण्याचे निर्देश दिले, तेव्हा वाद झाला होता, असे ते म्हणाले.
आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘विविध शाळांमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत शारीरिक शिक्षणात योगाचा समावेश करण्यात आला आहे, परंतु अनिवार्य करण्यात आलेले नाही.’
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी सर्व शाळांना योगाचा समावेश करण्यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. अनेक शाळांनी योगाचा समावेश केला असून, अन्य शाळांमध्येही या दृष्टीने काम प्रगतीपथावर आहे, असेही नाईक म्हणाले. योग दिन साजरा करण्यासाठी अंदाजे किती खर्च लागेल, असे विचारले असता, आयुष मंत्रालयाचे सचिव अजित शरण यांनी सांगितले की, ‘सर्वच बाबींचा विचार केल्यास एकूण सर्व खर्च शेकडो कोटींच्या घरात जाईल, परंतु आयुष मंत्रालयाच्या मते जवळपास १५ कोटी खर्च येईल.’ (प्रतिनिधी)
>सुट्टीबाबत मागणी झाल्यास पंतप्रधानांना विनंती करणार..
२१ जून रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित करणार का? यावर नाईक म्हणाले की, ‘त्याची गरज नाही. तशी कोणीही मागणी केलेली नाही. योगाची वेळ सकाळी असते. तेव्हा सार्वजनिक सुट्टीची गरज नाही. मात्र, अशी मागणी आल्यास मी पंतप्रधानांना सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याची विनंती करेन. या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी (२१ जून) रोजी येतो. मागच्या वर्षी तो रविवारी होता.’