यंदाची दिवाळी वीर जवानांना समर्पित - पंतप्रधान
By admin | Published: October 30, 2016 12:06 PM2016-10-30T12:06:17+5:302016-10-30T12:41:55+5:30
देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत.असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - "देशात दिवाळी साजरी होत असताना सीमेवर तणावाचे वातावरण आहे. देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी या बहादूर जवानांना समर्पित करू," असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली.
देशात सुरू असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नियंत्रण रेषेवर देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून देशाची सुरक्षा करत असलेल्या जवानांचा विशेष उल्लेख केला. "आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी अनेक कष्ट झेलत आहेत. आम्ही दिवाळी साजरी करत असताना देशाच्या संरक्षणासाठी कुणी हिमालयाच्या शिखरावर, तर कुणी वाळवंटात उभा राहून पहारा देत आहे. देशवासीयांच्या शुभेच्छांमुळे सैनिकांचे सामर्थ्य वाढते. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण जवानांना समर्पित करूया," असे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिवाळी हा अंध:काराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. "विविधतेने नटलेल्या आपल्या देशात वर्षभर कुठले ना कुठले सण साजरे होत असतात. सध्या दिवाळी सुरू आहे. आपला प्रत्येक सण कुठला ना कुठला संदेश देतो. तसा दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची शिकवण देणारा सण आहे. दिवाळीसाठी आपण घरात स्वच्छता करतो. पण आता केवळ घरापुरतेच मर्यादित न राहता या स्वच्छतेची व्यापकता वाढवण्याची आवश्यकता आहे," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले.
दिवाळी हा आता जागतिक सण बनत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. "जगभरात दिवाळी साजरी होत आहे. अमेरिकेत दिवाळीनिमित्त पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध झाले आहे. ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही असे कुठलेही शहर नसेल. कॅनडा, सिंगापूरच्या प्रमुखांनीही दिवाळी साजरी करतानाचे आपले फोटो प्रसिद्ध केले आहेत. एकूणच दिवाळी हा सण आता जगासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रेरणास्त्रोत बनत आहे," असे पंतप्रधांनांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधानांनी देशातील अनेक राज्ये आता उघड्यावर होणाऱ्या शौचापासून मुक्त होणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. तसेच गावातील 57 कुटुंबाना शौचालय बांधण्यास मदत करणारा आयटीबीपीचा जवान विकास ठाकूर याचे कौतुक केले. 21व्या शतकातही गावात वीज नसणे योग्य नाही. यासाठी प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याची योजना राबवली जात आहे. ती योग्य दिशेने पुढे जात असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
देशवासीयांना दिलेल्या संदेशादरम्यान पंतप्रधानांनी सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच एकतेसाठी झटणाऱ्या जयंतीदिनीच 1984 साली हजारो शिखांची हत्या झाल्याचाही उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.