दक्षिण भारतातून दिसणार या वर्षीचे शेवटचे दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 08:44 AM2019-11-30T08:44:25+5:302019-11-30T08:50:09+5:30
कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही.
मुंबई - 26 डिंसेबर रोजी दिसणारे सूर्यग्रहण हे 2019 वर्षीतील शेवटचे सूर्यग्रहण असेल. दक्षिण भारतातून केरळ,कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या राज्यातील काही शहरातून दुर्मिळ असे कंकणाकृती तर उर्वरित भारतातून ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणाची सुरुवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 8.00 वाजता होईल तर भारतातून 8.10 वा सुरुवात होइल आणि 11.10 समाप्ती होईल. हे वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण असून 2020 मध्ये 21 जूनला पुन्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.
कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणारे खग्रास ग्रहनावेळी पृथ्वी चंद्राचे अंतर कमी असते त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब हे सारखेच दिसते, म्हणून सूर्य बिंब हे चंद्रबिंबाने झाकल्या जाते, परंतु कंकणाकृती ग्रहनावेळी चंद्र आनी पृथ्वीचे अंतर जास्त असते तेव्हा सूर्य बिंब मोठे आणि चंद्र बिंब लहान असते, त्यामुळे चंद्रामुळे सुर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही, त्यामुळे कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. ह्या ग्रहनावेळी चंद्राची गडद सावली ही केवळ 118 किमीच्या रुंद पट्ट्यातून जात असल्याने त्याच प्रदेशातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल.
कंकणाकृती सूर्यग्रहण कुठून दिसेल?
ग्रहनाची सुरुवात कतार, सौदी अरेबिया, ओमान,भारत,सिंगापूर, मलेशिया,फिलिप्पीन,श्रीलंका, इंडोनेशिया या देशातील काही भागातून दिसेल. दक्षिण भारतात केरळ मधील (कन्नूर,कसारगोड,थालसरी,पलक्कड) कर्नाटकातील (मंगलोर,म्हैसूर,) तामिळनाडूतील (कोईमतूर,इरोडे, करूर, दिंडीगुल, कोझीकोडे,उतकमंड,शिवगंगा,तिरुचिरापल्ली,पुडकोट्टाई) येथून कंकणाकृती दिसेल.
खंडग्रास सूर्यग्रहण
महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून 60 ते 70 टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. विदर्भ, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी 08.10 वाजेपासून दिसेल, 09.32 वा ग्रहणामध्ये असेल तर 11.00 वा ग्रहण समाप्ती होईल.
ग्रहणात घ्या अशी काळजी
सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्याने पाहू नये, त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डोळे खराब किंवा अंधत्व येऊ शकते. ग्रहण पाहण्यासाठी ग्रहण चष्मे, काळे वेल्डींग ग्लास किंवा अगदी काळी सुरक्षित एक्स रे फिल्ममधून पाहावे. साध्या आरशाच्या काचेचा कॅमेरा करून भिंतीवर सूर्यबिंब पाडून ग्रहण पाहावे.
महाराष्ट्र आणि देशातील अनेक संस्था ग्रहण निरीक्षण शिबिरांचे आयोजन करणार आहे. स्काय वॉच ग्रुपतर्फे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणेंसह एक चमू मंगलोर येथे कंकणाकृती ग्रहण निरीक्षण आणि अभ्यासासाठी जाणार आहे. कुठल्याही अंधश्रद्धा न बाळगता, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून सूर्यग्रहण पाहावे असं आवाहन सुरेश चोपणे यांनी केलं आहे.