नर्स आणि तिच्या चिमुकलीच्या भेटीचा व्हिडिओ पाहून येडीयुरप्पा झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:50 AM2020-04-10T05:50:29+5:302020-04-10T05:51:05+5:30
डोेळे पाणावले : कोरोनाग्रस्तांच्या सेवेत असलेली नर्स पंधरा दिवसांपासून मुलीपासून दूर
बंगळुरू : बेळगाव येथील एका रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या सेवेत असलेल्या व पंधरा दिवस घरी न जाऊ शकलेल्या नर्सला तिच्या तीन वर्षे वयाच्या मुलीची लांबूनच भेट घ्यावी लागली. त्या क्षणाची व्हिडिओफीत पाहून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा खूप भावुक झाले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी राज्य सरकार प्राधान्याने सोडवेल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
व्हिडिओफीत समाजमाध्यमांवर झळकली असून, ती येडीयुरप्पांच्याही पाहण्यात आली. आईची भेट व्हावी म्हणून एका बालिकेने मांडलेला आकांत त्यांचे मन हेलावून गेला. ही नर्स व सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नि:स्वार्थी सेवेचे येडीयुरप्पा यांनी तिला दूरध्वनी करून तसेच एक पत्र लिहून कौतुक केले आहे. व्हिडिओफितीत दिसत असलेल्या नर्सचे नाव सुनंदा कोरेपूर असून, त्या बेळगाव इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस या संस्थेच्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कार्यरत आहेत. तिथे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याने त्या गेले दोन आठवडे स्वत:च्या घरी जाऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांची तीन वर्षांची मुलगी ऐश्वर्या आईची आठवण होऊन तिला भेटायचे आहे, असा वारंवार हट्ट करू लागली. (वृत्तसंस्था)
आईच्या भेटीसाठी मुलगी व्याकूळ
च्व्हिडिओफितीत दिसत असलेल्या नर्सचे नाव सुनंदा कोरेपूर असून, त्या बेळगाव इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (बीआयएमएस) या संस्थेच्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कार्यरत आहेत. रुग्णालयाने त्यांंच्या तात्पुरत्या निवासासाठी एका हॉटेलमधील खोली बुक केली असून, त्या दोन आठवड्यांपासून तिथे राहत आहेत.
मुलगी अगदीच ऐकेना, त्यामुळे त्यांचे पती श्रीकांत यांनी ऐश्वर्या या आपल्या मुलीला हॉटेलच्या बाहेर आणले; पण ही भेट झाली काही मीटर अंतरावरून.
च्ऐश्वर्याला आईच्या कुशीत जायची इच्छा होती; पण कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी दक्षता म्हणून सुनंदा कोरेपूर यांनी हॉटेलमधून लांबूनच आपल्या मुलीला डोळे भरून पाहिले.
च्आईजवळ जाता येत नाही म्हणून ऐश्वर्या धायमोकलून रडत होती. आई भेटल्याशिवाय मी जेवणारही नाही, असेही ती म्हणत होेती. त्यावेळी सुनंदा यांचे डोळेही पाणावले होते.