येडीयुरप्पांनी नाव बदलताच कर्नाटकमध्ये बनले स्थिर सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 03:14 PM2019-12-13T15:14:11+5:302019-12-13T15:15:09+5:30
नावात बदल केल्यामुळे येडीयुरप्पा यांना फायदा झाला असला तरी, ते स्वत: याला केवळ योगायोग समजतात.
बंगळुरु - नावात काय असतं ? असं म्हणताना आपण अनेकांना ऐकलं आहे. मात्र हेच तुम्ही नावात काय, अस कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पांना विचारल्यास, ते नक्कीच म्हणतील की, नावात बरच काही आहे. चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या येडीयुरप्पा यांनी आपल्या नावाच्या स्पेलींगमध्ये बदल केला आहे. त्याचा त्यांना फायदा झाल्याचे बोललं जात आहे.
याचवर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर येडीयुरप्पा यांनी आपल्या नावाच्या स्पेलींगमध्ये बदल केला होता. त्यांनी YEDDYURAPPA ऐवजी YEDIYURAPPA असा बदल करून घेतला होता. अंकशास्त्रानुसार त्यांनी आपल्या नावाच्या स्पेलींगमध्ये बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच त्यांना हा बदल करून घेतला होता. त्यानंतर त्यांनी लगेच बहुमत चाचणी पास केली होती.
दरम्यान कर्नाटकमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत 15 पैकी 12 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यानंतर राज्यात भाजपचे स्थिर सरकार स्थापन झाले. नावात बदल केल्यामुळे येडीयुरप्पा यांना फायदा झाला असला तरी, ते स्वत: याला केवळ योगायोग समजतात. येडीयुरप्पा यांच्यापूर्वी एआयएडीएमकेच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी देखील आपल्या नावात अशाच प्रकारचा बदल करून घेतला होता.