येडीयुराप्पांच्या उत्तराधिकाऱ्याने शड्डू ठोकले; 'तिकीट नाही दिले, भाजपाला २५ जागांवर फटका बसणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 07:27 PM2023-04-15T19:27:08+5:302023-04-15T19:27:47+5:30
येडीयुराप्पांनंतर शेट्टर यांनीच भाजपाचे प्रतिनिधीत्व करत राज्यातील सत्तेचा गाडा हाकला होता. शेट्टर हे हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
एकेकाळचे येडीयुराप्पांचे उत्तराधिकारी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपाने तिकीट न दिल्याने बंडाचे संकेत दिले आहेत. मला तिकीट न दिल्याने भाजपाला मोठा फटका बसणार असून आसपासच्या २० ते २५ जागांवर नुकसान होणार असल्याचा इशारा शेट्टर यांनी दिला आहे.
येडीयुराप्पांनंतर शेट्टर यांनीच भाजपाचे प्रतिनिधीत्व करत राज्यातील सत्तेचा गाडा हाकला होता. शेट्टर हे हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मला रविवारपर्यंत तिकीट जाहीर करावे, मी पक्षाच्या निर्णयाची वाट पाहिन नाहीतर माझ्या वेगळ्या पावलावर निर्णय घेईन असा इशाराच शेट्टर यांनी दिला आहे.
शेट्टर यांचा आसपासच्या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. यामुळे भाजपाने अद्याप या मतदारसंघासह कर्नाटकातील १२ मतदारसंघांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाहीय. शेट्टर यांनी आपल्या बंडाच्या भुमिकेला येडीयुराप्पांचाही हवाला दिला आहे. शेट्टर यांना ११ एप्रिलला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचाही फोन आला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने युवा नेत्यांना संधी देण्यासाठी जागा द्यावी, म्हणून तुम्ही उमेदवारी मागे घ्या, असे ते म्हणाले होते.
जर शेट्टर यांना उमेदवारी मिळाली नाही तर फक्त त्याच मतदारसंघात नाही तर उत्तर कर्नाटकातील अनेक मतदारसंघांवर तात्काळ प्रभाव पडेल. यामध्ये कमीतकमी २० ते २५ मतदारसंघ येतात, असे येडीयुराप्पा यांनीदेखील सांगितले आहे, असे शेट्टर म्हणाले. यामुळे पक्षाला देखील यामुळे नकारात्मक परिणाम होऊ नये असा विचार करावा, असेही शेट्टर म्हणाले.