Yes Bank Updates: येस बँकेत तुमचं खातं आहे का?... मग ही माहिती वाचाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 07:11 PM2020-03-06T19:11:58+5:302020-03-06T19:14:08+5:30
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येस बँकेमध्ये ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचे आश्वासन दिलेले असले तरीही या काळात केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत.
नवी दिल्ली : आरबीआयने गुरुवारी रात्री य़ेस बँकेवर महिन्याभराचे निर्बंध लादले आणि आज सकाळी शेअर बाजाराने नांगी टाकली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येस बँकेमध्ये ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचे आश्वासन दिलेले असले तरीही या काळात केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. आज बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. अनेक शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. या बँकेत खाते असल्यास काय होईल...जाणून घ्या.
येस बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट असल्यास...
आरबीआयने 50000 रुपयेच काढण्याचे लिमिट दिले आहे. जर पगार त्यापेक्षा जास्त असेल तर खातेधारकाला अडचण येणार आहे. यासाठी त्याने इतर पर्याय वापरावेत.
जर एकापेक्षा जास्त खाती असतील तर?
येस बँकेमध्ये एकापेक्षा जास्त खाती असतील तर त्याला या लिमिटचा मोठा फटका बसणार आहे. तो खातेदार एकत्रित 50 हजारच काढू शकणार आहे.
बँक बुडाल्यास काय?
केंद्र सरकारने नुकतीच बँक बुडाल्यास त्यातील 5 लाखांची हमी मिळणार असल्याची घोषणा केली होती. यानुसार जर बँक बुडाली तर ग्राहकांना त्यांच्या एकूण रकमेपैकी 5 लाखांची रक्कम मिळेल.
ईएमआय किंवा पैसे हस्तांतरण?
तात्काळ पैसे हस्तांतरण, चेक क्लिअरन्स आणि ईएमआय यापैकी ज्याची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना कोणताही त्रास होणार नाही. त्यांचे पैसे आपोआप कापले जातील. मात्र, ज्यांचे ईएमआय 50 हजारांपेक्षा जास्त आहेत त्यांना समस्या येईल.
कर्मचाऱ्यांचे काय?
येस बँकेला 20000 कर्मचाऱ्यांचा पगार आणि शाखांच्या इमारतीचे भाडे आदी रक्कम देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत आताच सांगणे कठीण आहे. कारण जर बँक बंद झाली तर कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असेल.
SBI मध्ये विलिनीकरण झाले तर?
सध्याच्या हालचालींनुसार ही चांगली बातमी आहे. जर एसबीआयने ही बँक ताब्यात घेतली तर येस बँकेचे ग्राहक सुरक्षित राहतील.