होय... मी टायगर मेमनला भेटलो होतो - काँग्रेस आमदार
By Admin | Published: July 31, 2015 05:03 PM2015-07-31T17:03:20+5:302015-07-31T17:20:45+5:30
पाकव्याप्त काश्मीरमध्ये टायगर मेमनची अनेकदा भेट झाली होती अशी खळबळजनक कबुली जम्मू काश्मीरमधील काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ३१ - पाकव्याप्त काश्मीरमध्ये टायगर मेमनची अनेकदा भेट झाली होती अशी खळबळजनक कबुली जम्मू काश्मीरमधील काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी दिली आहे. बदला घेण्यासाठीच टायगर मेमनने मुंबईत बॉम्बस्फोट घडवले असा दावाही माजिद यांनी केला आहे.
जम्मू काश्मीर बंदीपोर येथून निवडून येणारे उस्मान माजिद हे स्वतः पूर्वी दहशतवादी होते. मात्र १९९५ मध्ये ते पुन्हा भारतात परतले व दहशतावाचा मार्ग सोडून जम्मू काश्मीरमधील राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला अपक्ष व आता काँग्रेसच्या तिकीटावर ते जम्मू काश्मीर विधानसभेत निवडून जातात. याकूब मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर माजिद यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्यांनी १९९३ ते ९४ या काळात टायगर मेमनची भेट झाल्याची कबुली दिली. टायगर हा हिलाल बेगचा जवळचा मित्रा होता व तो पाकव्याप काश्मीरमध्ये पाहुणा बनून यायचा. माझी ३ ते ४ वेळा टायगरशी भेट झाली होती असे उस्मान यांनी सांगितले. हिलाल बेग हा इखवान हे मुस्लिमीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता व माजिद हे बेग याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचेय
मुंबई बॉम्बस्फोटानंतर टायगर मेमन कराचीत होता व त्याने अनेकदा आमच्या कार्यालयात भेटही दिली होती. नोव्हेंबर १९९३ मध्ये पहिल्यांदा उस्मान यांची टायगर मेमनसोबत भेट झाली होती. या भेटीला उजाळा देत माजिद म्हणाले, मुंबईत बॉम्बस्फोट का घडवला असा सवाल मी टायगरला विचारला होता. यावर टायगर म्हणाला होता, १९९२ च्या दंगलींनंतर काही मुस्लिम महिला माझ्या घरी आल्या होत्या. त्यांनी मला बांगड्यांचा आहेर दिला होता. यानंतर मी बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवल्याची कबुली टायगरने दिली होती असे उस्मान माजिद यांनी सांगितले.