‘हो, हे शक्य आहे’ मनसेची ब्लू प्रिंट आज
By admin | Published: September 25, 2014 04:16 AM2014-09-25T04:16:19+5:302014-09-25T04:16:19+5:30
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू, असे आवाहन करीत आपल्या स्वप्नातील महाराट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्या सभेत केली
मुंबई : जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू, असे आवाहन करीत आपल्या स्वप्नातील महाराट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्या सभेत केली. मात्र, त्यानंतर आठ वर्षे ‘कुठेय ब्ल्यू प्रिंट’ या प्रश्नाचे उत्तर देताना मनसेची स्थिती अवघड झाली होती. अखेर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर ब्ल्यू प्रिंट सादर होत आहे.
षण्मुखानंद सभागृहात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ही ब्ल्यू प्रिंट सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मनसे कामाला लागली असून सोशल मीडियात कलात्मक फोटो आणि व्हिडीओ क्लीप अपलोड करण्यात येत आहे. ‘हो, हे शक्य आहे’ अशी टॅगलाईनही या विकास आराखड्यासाठी बनविली आहे. या माध्यमातून राज ठाकरे काय कार्यक्रम देतात, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर मनसे काहीशी बाजूला गेल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होऊनही पक्षात शांतता आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रकाशित होणाऱ्या या आराखड्याच्या माध्यमातून राज विधानसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची शक्यता असल्याने मनसैनिकांमध्ये ते काय बोलणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे.