होय, स्वाती मालीवाल यांना झाली होती मारहाण; 'आप'चे नेते संजय सिंह यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 09:59 AM2024-05-15T09:59:44+5:302024-05-15T10:00:46+5:30
पक्षातील मतभेद उघड
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या एकमेव महिला खासदार, राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांच्या मारहाण प्रकरणाचे रहस्य अखेर उलगडले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी मालीवाल यांना मारहाण झाल्याची कबुली आज राज्यसभेतील 'आप'चे नेते संजय सिंह यांनी दिली. या कबुलीमुळे आम आदमी पार्टीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांनी मालीवाल यांच्याशी अभद्र वर्तन केल्याचा ठपका ठेवून केजरीवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचे सिंह यांनी सांगितले. सोमवारी केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेलेल्या मालीवाल त्यांची प्रतीक्षा करीत असताना तिथे पोहोचलेले विभवकुमार यांनी मालीवाल यांच्याशी अभद्र वर्तन केले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती ११२ क्रमांकावर फोन लावून मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना दिली होती.
पुढचा नंबर चड्ढांचा?
या घटनेनंतर मालीवाल दिल्लीच्या सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात गेल्या. पण पक्षांच्या दबावाखाली त्यांनी लेखी तक्रार करण्याचे टाळल्याचे म्हटले जात आहे. मार्च महिन्यात केजरीवाल यांना ईडीने अटक केली तेव्हा 'आप'चे राज्यसभा सदस्य राघव चड्ढा आणि स्वाती मालीवाल हे दोघेही विदेशात होते. पक्ष संकटात सापडला असताना अलिप्त राहिलेल्या या दोन्ही सदस्यांवर दबाव येत असून लवकरच चड्ढा यांच्याबाबतीतही असेच घडेल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. स्वाती मालीवाल आणि राघव चड्ढा यांच्याकडून राज्यसभा सदस्यत्वाचे राजीनामे घेऊन संकटकाळी केजरीवाल यांचा बचाव करणाऱ्या दोन व्यक्तींना राज्यसभेवर पाठविण्याचे राजकारण या घडामोडीमागे असल्याची चर्चा आहे.
केजरीवाल यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक
मालीवाल यांना कोणत्या कारणामुळे कुटुंबीयांनी वा पक्षाने मारहाण करायला लावली, असा प्रश्न उपस्थित होतो. २ जून रोजी केजरीवाल पुन्हा तुरुंगात जातील तेव्हा पक्षातील फूट वाढत जाणार हे दिसत आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांचा स्वीय सहायक एका महिला खासदाराला मारहाण करीत असेल तर दिल्लीत महिला सुरक्षित कशा राहू शकतात, असा सवाल भाजपच्या उमेदवार बासरी स्वराज यांनी केला.
'घटना निंदनीय'
ही निंदनीय घटना असून मालीवाल यांच्यासोबत अभद्र वर्तन करणाऱ्या लोकांचे 'आप' समर्थन करीत नाही, असे संजय सिंह माध्यमांना सांगितले