योगगुरु रामदेव बाबा यांच्या भावावर हत्येचा गुन्हा
By admin | Published: May 28, 2015 11:35 AM2015-05-28T11:35:24+5:302015-05-28T16:14:34+5:30
योगगुरु रामदेव बाबा यांच्या हरिद्वारमधील आश्रमातील हाणामारीत एकाचा मृ्त्यूप्रकरणी रामदेव बाबा यांचे बंधू राम भरत यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. २८ - योगगुरु रामदेव बाबा यांच्या हरिद्वारमधील आश्रमातील हाणामारीत एकाच्या मृ्त्यूप्रकरणी रामदेव बाबा यांचे भाऊ राम भरत यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राम भगत यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
रामदेव बाबा यांच्या हरिद्वार येथील पतंजली हर्बल फुड पार्क येथे बुधवारी पार्कचे सुरक्षा रक्षक व स्थानिक वाहतूकदारांमध्ये हाणामारी झाली. हर्बल पार्कमधील सामानांच्या वाहतूकीचे कंत्राट स्थानिक वाहतूकदारांना द्यावे अशी मागणी स्थानिक वाहतूक संघटनेने केली होती. तर पतंजली व्यवस्थापनाने स्वस्त दरात वाहतूक सेवा देणा-यांनाच कंत्राट देऊ अशी भूमिका घेतली होती. यावरुन पतंजली प्रशासन व वाहतूकदार यांच्यात वाद सुरु होता. पतंजलीच्या प्रशासनात सक्रीय असलेले रामदेव बाबा यांचे बंधू राम भरत हेदेखील वाहतूकदारांसोबत चर्चा करण्यासाठी आले होते. काही वेळाने वाद चिघळल्याने पतंजलीचे कर्मचारी व वाहतूकदारांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान दलजित सिंह या चालकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी राम भरत यांच्यासह पतंजलीतील अन्य कर्मचा-यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन राम भरत यांनी कर्मचा-यांना हाणामारीसाठी उकसवल्याचे दिसते अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली.