योग दिनाची रंगीत तालीम; पाच हजार जवान होणार सहभागी

By admin | Published: June 20, 2015 12:49 AM2015-06-20T00:49:28+5:302015-06-20T00:49:28+5:30

मुंबईसह देशाचा अनेक भाग मुसळधार पावसाने ओलाचिंब झाला असताना २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे.

Yoga daytime training; Five thousand soldiers will participate | योग दिनाची रंगीत तालीम; पाच हजार जवान होणार सहभागी

योग दिनाची रंगीत तालीम; पाच हजार जवान होणार सहभागी

Next

नवी दिल्ली : मुंबईसह देशाचा अनेक भाग मुसळधार पावसाने ओलाचिंब झाला असताना २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. लाखो लोक योगाभ्यासात व्यग्र आहेत. शुक्रवारी योग दिनाच्या रंगीत तालमीदरम्यान राजपथ हजारो लोकांनी फुलून गेले होते.
राजपथावर रंगीत तालीम
राजपथावरील रंगीत तालमीत विविध शाळांचे विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेटसह १२,००० लोकांनी योगाभ्यास केला, अशी माहिती या समारंभाच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रंगीत तालीम सकाळी ७ वाजता सुरू होऊन ७.३३ ला संपली. रविवारीसुद्धा याच वेळी योगासने केली जातील. रंगीत तालमीत सहभागी होणाऱ्यांना आसन बघता यावे म्हणून राजपथावर २३ भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. राजपथावरील योग दिन समारंभात ३५ हजारांवर लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
पाच हजार जवानांचा सहभाग
विशेष म्हणजे केंद्रीय दलांचे ५,००० जवान राजपथवर नागरिकांसोबत योगासने करणार आहेत. यामध्ये कें द्रीय औद्योगिक सुरक्षा दल, कें द्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)आणि सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) प्रत्येकी १२०० जवान, तर भारत-तिबेट सीमा दल (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) प्रत्येकी ७०० जवानांचा समावेश राहील.
परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित भव्य समारंभाचे नेतृत्व करणार असून गृहमंत्री राजनाथसिंग लखनौमधील योग शिबिरात सहभागी होतील. लखनौ, पाटणा आणि कोलकात्यात भव्य योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू चेन्नईला जाणार असून तेथे ३० हजारांवर लोक योगाभ्यासात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.


पर्यटनमंत्री महेश शर्मा नोएडास्थित आपल्या मतदारसंघात हजेरी लावतील. कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा केरळची राजधानी तिरुवअनंतपूरममध्ये, तर आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा हैदराबादच्या संजीवय्या पार्कमधील योग शिबिरात भाग घेतील. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर मेरठमध्ये योगाभ्यास करतील आणि महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी पिलीभीत या त्यांच्या मतदारसंघात योग शिबिराला उपस्थित असणार आहेत.
कें द्रीय मंत्र्यांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड दिल्लीत, तर मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी या दिवशी शिमल्याला असणार आहेत.

उत्तराखंड सरकारने पवित्रा बदलला
आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभात सहभागी होणार नाही असे सांगणाऱ्या उत्तराखंड सरकारने पवित्रा बदलला असून अधिकृतपणे या कार्यक्रमात सहभागाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हरीश रावत डेहराडूनमध्ये राज्यस्तरीय योग शिबिराचे उद्घाटन करतील. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ओमप्रकाश यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे रावत यांनी दोन दिवसांपूर्वीच एका पत्रपरिषदेत आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे प्रचाराची कवायत असल्याची टीका करून राज्यात कुठल्याही सरकारी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही, असे जाहीर केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Yoga daytime training; Five thousand soldiers will participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.